औरंगाबाद : दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी पावसामुळे मोठ मोठी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेक भागात रस्त्यांवर तळे साचले. त्यामुळे तेथील वाहतूक मंदावली. शहरात तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील सर्वच भागात दुपारी १२ वाजेपासून संततधार पाऊस सुरू झाला. सायंकाळपर्यंत चाललेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत: दुपारचे शाळकरी विद्यार्थी, खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना अडचणीचा सामना करावा लागता. शहरातील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जालना रोडवर क्रांतीचौक, दूध डेअरी, हायकोर्ट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. औरंगपुरा, टीव्ही सेंटर चौक, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील कार्तिकी हॉटेल, सिडकोतील भगवानबाबा होमिओपॅथिक कॉलेज जवळचा रस्ता, जवाहर कॉलनी, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, चिकलठाणा, सातारा परिसर या भागातील रस्त्यांंनाही तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक मंदावली होती. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अविश्रांतपणे हा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सुरू राहिला. या दमदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातील नाले ओसंडून वाहिले. बारुदगरनाला, औरंगपुऱ्यातील नाला दुथडी भरून वाहत होता. शहरात १ जूनपासून आतापर्यंत बऱ्याच वेळा पाऊस झाला. मात्र आज झालेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा पाऊस ठरला. ४मंगळवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान तब्बल ६६.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. शासकीय निकषानुसार दिवसभरात ६५ मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते. याआधी शनिवारी १० मि. मी., रविवारी ८.६ मि. मी. आणि सोमवारी ५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. मुथियान कॉर्नर परिसरात पाणीच पाणी क्रांतीचौक प्रभागातील मुथियान कार्नर येथील कोहिनूर गार्डन व त्या मागील वसाहतीत पावसामुळे पाणी शिरले होते. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला बोलावून घेतले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी पाणी काढण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी पंकज वाडकर यांच्यासह नागरिकांनी मदत केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षित भिंतीला लागून असलेले एक मोठे झाड सायंकाळी मुळासकट उन्मळून खाली पडले. मात्र यामुळे काहीही हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला.
'येलो मोझॅक'चे व्यवस्थापन गरजेचे
By admin | Updated: July 6, 2016 00:41 IST