अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती दिली जाणार असल्याने त्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना श्रेणीपत्रिका मिळणार असून, श्रेणीसोबतच आरटीई कायदा २००९ नुसार वर्गोन्नती असा शेरा विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेवर राहणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच गेले आहे. प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गासाठी शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभ्यास मालिकेच्या मदतीने शिक्षण सुरू ठेवण्यात आले. शैक्षणिक वर्षाअखेरीस परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश करणे शक्य नसल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली जाणार आहे. गतवर्षी परीक्षेच्या काळातच कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. त्यामुळे वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र, घटक चाचण्या व प्रथम सत्र झाले होते. त्यामुळे गतवर्षी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पहिले सत्र व चाचणीच्या गुणांची सरासरी काढून वार्षिक गुणपत्रक देण्यात आले होते. मात्र, यावर्षी संपूर्ण वर्ष ऑनलाइन गेल्याने विद्यार्थ्यांना गुणांऐवजी श्रेणी दिली जाणार आहे. वर्गोन्नतीचा उल्लेख गुणपत्रिकेवर केला जाणार आहे. याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. विविध तांत्रिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन केले आहे. त्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण लक्षात घेऊन त्याचे रुपांतर शंभर गुणांमध्ये करून त्यांना श्रेणी द्यावी ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार पुढील वर्गात प्रवेश द्यावा. आकारिक व संकलित मूल्यमापनानुसार क २ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी मित्र पुस्तकाच्या आधारे गुण द्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिले आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या कृतिपत्रिकाबाबत पुढील काळात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.