आरटीओला इशारा : अन्यथा आंदोलन करू!तिवसा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरात व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या ने-आण करणाऱ्या स्कूल बसला हलगर्जीपणा व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यापैकीच चार वर्षापूर्वी शहरातील नवसारी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून इतकी भीषण घटना घडल्यानंतरही याबाबत परिवहन विभाग हा विषय गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर थातूर-मातूर कार्यवाही करून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात असलेल्या नियमांचे कठोर पालन होत नसल्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, शाळेतीेल मुलींची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असते. परंतु ही समिती निर्माण करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात समिती कार्यान्वित झाली का याचा आढावा घेण्याची मागणी करुन ज्या बसमध्ये विद्यार्थिनी असतात. त्या बसध्ये स्त्री सहवर्ती ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना हा कायदा राजरोसपणे मोडण्यात येत असल्याचे ही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सुरक्षित वाहतूक ही जबाबदारी आरटीओ, पोलीस विभाग व शिक्षण विभागाची असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन व आॅटोमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचे दिसूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नही. ही बाब निश्चितपणे संतापजनक असल्याचे सांगून हा अघोरी प्रकार आणखी किती दिवस घालून निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून याबाबत कठोर कार्यवाही व्हावी व नियम पायदळी तुडवणाऱ्या स्कूल बसमालक व चालकांवर नियमांचे पालन करण्याबाबत त्वरित निर्णय होण्यासोबतच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. (प्रतिनिधी)
बेशिस्त स्कूल वाहनधारकांवर यशोमती ठाकूर संतापल्या
By admin | Updated: July 8, 2016 00:04 IST