सत्यमेव जयते : ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांची उपस्थिती
वरूड : सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने वरूड पंचायत समितीच्यावतीने सहभागी २१ गावांची कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला होता. यावेळी समृद्ध गाव विषयांवर चर्चा करण्यात आली. वॉटर कप स्पर्धेचा अनुभव, स्पर्धेचे फायदे, नव्याने सुरू झालेल्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये कोणकोणत्या विषयांवर काम करण्यात येणार आहे, यावर चर्चा झाली.
पुढील काही दिवसामंध्ये करावयाच्या १२० गुणांच्या कामाचे नियोजन करण्यात आले. सर्व विभागांच्या विविध योजनांची जोड देऊन गाव कसे समृद्ध करावे, याविषयी सर्वच विभागाच्या प्रमुखांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. तालुक्यातील उदापूर, चिंचरगव्हाण, देऊतवाडा, वाठोडा, करजगाव, गोरेगाव, जामठी गावांमधील सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. पंचायत समितीचे बीडीओ कनाटे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यशाळेसाठी तालुक्यातील पिंपळखुटा, गव्हाणकुंड, सावंगी, सावंगा, पोरगव्हाण, उदापूर, जामठी, कारली, देऊतवाडा, चिंचरगव्हाण, वाठोडा, इस्माईलपूर, करजगाव, गोरेगाव, आलोडा, पांढरघाटी, जामगाव खडका, माणिकपूर, झटामझिरी, टेंभूरखेडा, कारली, मुसळखेडा या गावांतील ग्रामपंचायत सचिव, सरपंच, सदस्य, शिक्षक, तलाठी, कृषी सहायक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सीआरपी, कृषिसखी, कृषिमित्र, अंगणवाडी सेविका, आशा, कोतवाल, पोलीस पाटील, माजी सरपंच, जलमित्र उपस्थित होते. या कार्यशाळेला तालुका समन्वयक आरती खडसे व जयकुमार सोनुले यांनी मार्गदर्शन केले.