चिखलदरा : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे तीन टप्प्यात नगर परिषद कर्मचारी आंदोलन करणार आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
चिखलदरा नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वानखडे व सचिव अनिकेत. लहाने यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यातील निषेध आंदोलन करण्यात आले.
१ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर १५ एप्रिल रोजी एक दिवस लेखणीबंद आंदोलन करणे व यानंतरसुद्धा शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न प्राप्त झाल्यास १ मे या कामगार दिनापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
१०० टक्के वेतन व सेवानिवृत्ती शासनाकडून मिळणे, कोषागारामार्फत वेतन अदा होणे, सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकीचा पहिला हप्ता शासनाकडून मिळणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे आदी मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली, कामबंद आंदोलने करण्यात आली. परंतु अद्याप याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे राज्यस्तरावर संघटनेमार्फत सदर तीन टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.