चांदूर बाजार : शहरातील नगरपालिका हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत १ कोटी ५६ लाखांच्या निधीची विविध विकासकामे समाजकल्याण विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राअभावी प्रलंबित आहे. यामुळे समाजकल्याण विभागाने नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी सहायक आयुक्त समाकल्याण विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सदर विकासकामांकरिता सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग अमरावती यांचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. यामुळे प्रास्ताविक कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करता येणार नाही. याबाबतचे त्रुटी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगर परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजनेचा निधी अखर्चित असून, या वस्तीतील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. करिता चांदूर बाजार नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या विविध विकासकामांना समाजकल्याण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.