जिल्हाकचेरीवर महिलांची धडक : दुकान बंद करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरूड नगरपालिका क्षेत्रातील देशी दारूचे दोन्ही दुकाने बंद करण्यासाठी नारीशक्ती एकवटली. वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनद्वारे दारुबंदी साकडे घालण्यात आले.वरूड येथील सती चौकालगत व संत्रा मंडीसमोरील देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुल्हाने यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. याच परिसरात गुजरी बाजार भरतो. शहरातील महिला, मुली व नागरिकांना नेहमीचे यावे लागते. संत्रा लिलाव मंडीसमोर जयस्वाल यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोरून मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु या दुकानामुळे महिला, मुली, वृद्ध व नागरिकांना मद्यपीच्या धुमाकुळाचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस या दोन्ही ठिकाणी मद्यपींचा हैदोस वाढत असून महिला, मुली व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपी लोकवस्तीच्या ठिकाणी लघुशंका करणे, शिवीगाळ करणे, असे प्रकार वाढले आहे. त्यामुळे दोन्ही दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी येथील महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी वसुधा बोंडे, अर्चना मुरूमकर, रोशनी रेवडे, अश्विनी मोवळे, वंदना बोबडे, माला इंगळे, सुनीता युवनाते, छाया तायवाडे, नलिनी रक्षे, विठाबाई यादव, शहनाज परविन, वंदना मोवळे, पुष्पा धकिते, मंदा आगरकर, शरीफाबी, शोभा वरूडकर, राबीयाबी, लिला साखरकर, लता रेवडे व अन्य महिला उपस्थित होत्या.जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला प्रस्ताववरूड येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी शासन निर्णयानुसार २५ टक्के महिलांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव दुकान बंद करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानुसार दारू दुकान असलेल्या वॉर्डातील आवश्यक स्वाक्षरीचा प्रस्ताव ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह द्यावा, अशी सूचना निवेदनकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याला आंदोलक महिलांनी होकार दर्शविल्याने जिल्हाधिकारी बांगर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना महिलांच्या स्वाक्षरीची शहानिशा करण्यासाठी स्थानिक उत्पादन शुल्क निरीक्षकांना हजर राहण्याबाबत सुचविले आहे. त्यानुसार योग्य प्रस्ताव आल्यास मतदान घेऊन दुकान बंद करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
वरूडात दारूबंदीसाठी नारीशक्ती एकवटली
By admin | Updated: May 23, 2017 00:09 IST