वरुड येथे आंदोलन : तहसीलदारांना दिले निवेदन वरुड : शहरातील देशी दारुच्या दुकानांमुळे मद्यपींपासून महिला त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकवेळा तक्रारी करुन सुध्दा कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर सामाजिक कार्यकर्ते सचिन आंजिकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांना निवेदन सादर करुन त्वरीत दुकाने बंद करावे, अन्यथा तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर तसेच मध्यवस्तीमध्ये देशी दारुची दुकाने थाटण्यात आली आली आहे. येथे येणाऱ्या मद्यपींपासून महिला तसेच नागरिकांना वाईट प्रवृत्तीला सामोरे जावे लागते तर महिलांची छेडखानी, शिवीगाळसारखे प्रकार घडतात. खेड्यापाडयातून येणाऱ्या नागरीकांची सुध्दा गळचेपी होते. रस्त्याने जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थींना त्रास होत असल्याने शहरातील देशी दारुची दुकाने बंद करावी, अशी मागणी अनेकवेळा करुन सुध्दा प्रशासनाने लक्ष दिले नाही. सदर देशी दारुची दुकाने आदेशित वेळेत न उघडता पहाटे चार वाजेपासूनच सुरु होतात आणि रात्री १२ वाजता बंद केल्या जाते. सदर दुकाने हे वर्दळीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी असल्याने महिलांसह सभ्य नागरिकांची सुध्दा कुचंबणा होते. सकाळपासूनच मद्यपींचा गोंधळ, धिंगाणा शहरात पाहावयास मिळतो. दारुच्या व्यवसनाधिनतेमुळे अनेक गोरगरीबाचे संसार उध्वस्त झाले. तर घरातील भांडीकुंडी विकून मद्यप्राशन केल्या जाते. यामुळे घराघरात भांडणे सुरु असतात. मध्यवस्तीत हे देशी दारु विक्रीची दुकाने असल्याने तरुणाई सुध्दा व्यसनाधिनतेकडे वळत असल्याने अखेर शहरातील शेकडो महिलांनी सचिन आंजिकर , शाम शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातून मोर्चा काढून नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांना निवेदन दिले. शहरातील देशी दारु विक्रीचे दुकाने बंद झाली नाही तर तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिलांनी प्रशासनाविरुद्ध नारेबाजी दिली. (तालुका प्रतिनिधी)
दारू दुकाने बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार
By admin | Updated: January 5, 2017 00:15 IST