उंबरखेड येथे रास्ता रोको : ५० पेक्षा अधिक ट्रक अडवले, तणावाची स्थितीतिवसा : तालुक्यातील उंबरखेड येथील रेतीघाटातून भरधाव वाहनांनी गावातून होणारी रेतीची वाहतूक बंद करा, यामागणीसाठी शुक्रवारी महिला रस्त्यावर उतरल्या. महिलांसह गावकऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करून रेतीचे पन्नासच्यावर ट्रक अडविल्याने परिसरात तब्बल ६ तास तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. उंबरखेड येथील नदीतील रेतीघाटाचा १ कोटी ५१ लाख रूपयांमध्ये लिलाव झाला. मात्र, या घाटातून रेतीची दिवसाढवळ्या ‘ओव्हरलोड’ वाहतूक होते. गावातूनच भरधाव ट्रक धावत असल्याने गावातील वहिवाटीच्या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. शिवाय या भरधाव वाहनांमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जिविताला धोका संभवतो. रेतीच्या जडवाहतुकीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्यात. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाहीत. अखेर गावातील महिलांनी आक्रमक होत रस्त्यावर येऊन गावातून होेणाऱ्या रेती वाहतुकीविरोधात एल्गार पुकारला. ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आंदोलनामुळे शुक्रवारी दिवसभर रेतीची वाहतूक बंद होती. तहसीलदार राम लंके, नायब तहसीलदार पंधरे, ठाणेदार दिनेश शेळके यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नव्हता. रेतीची वाहतूक उंबरखेड गावातून चालू आहे. नियमानुसार याच रस्त्यावरून वाहतूक केली जात आहे. पर्यायी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी सध्या कायदा हातात घेऊ नये. - राम लंके, तहसीलदार, तिवसा
रेती वाहतुकीविरोधात महिलांचा एल्गार
By admin | Updated: November 19, 2016 00:09 IST