पालकमंत्री पोटे : अंजनगाव सुर्जी, अचलपूर महिला मेळावाअंजनगाव सुर्जी : राजमाता जिजाऊ व स्त्रियांना शिक्षणाचा वसा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याकडून महिलांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री पोटे यांनी शनिवारी येथे केले.अंजनगाव सुर्जी येथील सिध्देश मंगलम कार्यालयात आयोजित महिला बचतगटाच्या भव्य मेळाव्याला ते संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश बुंदिले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष क्षमा चौकसे, प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, मेघा भारती, नंदा काळे, मीना बुंदिले, संगीता काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले, या देशाला सक्षम व कर्तबगार महिलांचा वारसा लाभला आहे. महिला अबला नसून सबला आहेत. महिलानी महिलाना प्रोत्साहन द्यावे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांचे प्रशिक्षण घेण्यात येते. त्याव्दारे आतापर्यंत १५ हजार महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.स्त्रियांनी आत्मबल वाढविले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. पालकमंत्र्यांनी अचलपूर येथील कल्याण मंडपम् येथे आयोजित कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष गंदलाल नंदवंशी, सभापती महिला बालकल्याण शोभा मुगल, नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्याकडून महिलांनी प्रेरणा घ्यावी
By admin | Updated: March 13, 2016 00:12 IST