बडनेरा येथील घटना : नागरिक संतप्त, पोलिसांची मध्यस्थीबडनेरा : स्टार बसमधून उतरताना एका ४० वर्षीय महिलेचा तोल गेल्याने तिचा पाय चाकाखाली आला. या अपघातात महिलेच्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. येथील अलमास गेटजवळच्या चौफुलीजवळ सोमवारी ही घटना घडली. घटनास्थळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त केला. पोलीस वेळीच पोहोचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुरेखा महादेव बोबडे (४०) असे बसमधून पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला अमरावतीहून वाशिमकडे जाण्यासाठी सोमवारी ३० मे रोजी घरून निघाली. मात्र, अचानक बडनेरात उतरून घरी परत जाण्यासाठी ती स्टारबसमध्ये चढली. जुन्यावस्तीच्या थांब्यापासून थोड्याच अंतरावर महिलेने पुन्हा बस थांबविण्यास सांगून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. बस पूर्णत: थांबण्यापूर्वीच चालकाने ब्रेक मारल्याने महिलेचा तोल गेला व त्या खाली पडल्या. त्यांचा पाय बसच्या समोरच्या चाकाखाली येऊन यात त्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय साळुंखे तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याने बसची तोडफोड टळली. जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले तेथून तिला नागपूरच्या खासगी दवाखान्यात हलविले आहे. (शहर प्रतिनिधी)
स्टार बसखाली आल्याने महिलेच्या पायाचा चेंदामेंदा
By admin | Updated: May 31, 2016 00:03 IST