कामनापूर येथे पार पडला आदर्श विवाह :
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील छोटेसे गाव असलेल्या कामनापूर येथे एका शेतमजुराच्या घरी सोमवारी त्यांच्या मुलीचा आदर्श विवाह पार पडला. पाहुणे मुली बघण्यासाठी आले, पसंती झाली अन तेथेच साक्षगंध झाले. विवाहदेखील पार पडला. या आदर्श विवाहाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील रहिवासी पंकज घाटे नामक मुलाची सोयरीक कामनापूर येथील ज्ञानेश्वर महिंगे यांची मुलगी ममता हिच्याकरिता जुळून आली. सचिन मुंडाले यांनी दोन्ही कुटुंबाची मध्यस्थी केली. ३ मे रोजी काही आप्तांसह मुलगा कामनापूर येथे दाखल झाला. मुलीची पसंती झाली. त्यामुळे लग्नाची तारीख आणि साक्षगंध करण्याचा प्रस्ताव मुलाकडून ठेवण्यात आला. मुलगी ममताचे वडील महींगे हे ग्रामपंचायत स्तरावरील वृक्षलागवड योजनेअंतर्गत मजूर म्हणून कार्यरत आहेत. परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे लग्न इतक्या लवकर कसे करावे, या विवंचनेत ते होते. मुलाकडील मंडळींनी त्यांची ही अडचण ओळखली आणि त्यांना साक्षगंध आणि लग्न आताच करण्याचा प्रस्तावही दिला. सुरुवातीला महिंगे अवाक् झाले. परंतु, मुलाकडून आलेला हा प्रस्ताव त्यांनी कोरोनाची परिस्थिती आणि आपल्याकडील आर्थिक स्थिती पाहता स्वीकारला.
कोरोना नियमांचे पालन
दोन्ही कुटुंबांची मने जुळल्याने लगेच लग्नाचीदेखील तयारी सुरू झाली आणि कोणत्याही पाहुण्याविनाच महिंगे आणि घाटे कुटुंबाच्या समन्वयाने हा आदर्श विवाह कामनापूर येथे वधुमुक्कामी पार पडला. कामनापूर जावरा हे गाव कोरोना ‘हॉट स्पॉट’ असल्याने बडे अधिकारीदेखील गावात आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने सर्व नियमांचे पालन करीत दोन्ही कुटुंबाने हा विवाह सोहळा पार पाडला.