आसेगाव पूर्णा : आसेगाव आणि वलगाव पोलिसांनी तांब्याची तार चोरण्याच्या आरोपाखाली वेगवेगळ्या टोळीतील आरोपींना पकडले तरी तार चोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी पुन्हा मेघनाथपूर-भूगाव परिसरात तार कापून नेल्याने पोलीस प्रशासन व वीज वितरण कंपनीपुढे आव्हान उभे ठाकले आहे. वीज वितरण कंपनीच्या ब्रिटिशकालीन अमरावती-आसेगाव-अचलपूर या ३३ के. व्ही. च्या विद्युत वाहिनीवरील किमतीची तांब्याची तार चोरुन नेण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाढले आहेत. वायगाव फाटा ते मक्रमपूर दरम्यान २ जुलैच्या तार चोरी प्रकरणी वलगाव पोलिसांनी दर्यापूर व अकोला जिल्ह्यातील पाच आरोपींना तर आसेगाव पोलिसांनी पूर्णानगर ते मेघनाथपूर दरम्यान झालेल्या चोरी प्रकरणी बाळापूर (जि. अकोला) येथील ५ आरोपींना १५ जुलैचे रात्री सापळा रचून मुद्देमालासह दर्यापूर फाट्यावरून अटक केली. चौकशी दरम्यान आरोपींनी दोन गुन्ह्यांची कबुलीही दिली. आरोपींना जेरबंद केल्यानंतर यापुढे तार चोरीला आळा बसणार असे वाटले होते. पण यानंतरही वलगाव परिसरातून वीज तार चोरी करताना दोन महिला गंभीररीत्या भाजल्या व त्यापैकी एकीचा मृत्यू झाला आणि यानंतर रविवारी रात्री मेघनाथपूर परिसरातील आठ विद्युत खांबावरील सात गाले तांब्याच्या तारेची चोरी झाली. बुधवारला मेघनाथपूर-भूगाव-जवर्डी परिसरातून विद्युत वाहिनीच्या खांबावरील पाच लाखांची तांब्याची तार कापून नेल्याचे उघडकीस आले. विद्युत पुरवठा बंद असल्याने अनेक गावे अंधारात होती आणि ओलिताचे काम बंद होते. त्याचबरोबर कापलेल्या तारांची ओढाताण करताना शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व वीज वितरण कंपनीलाही लाखो रूपयांचा चूना लागला. या वाहिनीवर तांब्याची तार असल्याने चोरटे अचलपूर-परतवाड्यापर्यंत या वाहिनीवर हात साफ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आसेगाव परिसरात आरोपींच्या अटकेनंतरही तार चोरीचे सत्र
By admin | Updated: August 8, 2015 00:27 IST