वरूड : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहन क्षमतेपेक्षा अधिक रेतीची तस्करी खुलेआम सुरू असून, रेती तस्कराची मनमानी सुरू आहे. प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे 'अर्थ'पूर्ण ओव्हरलोड रेतीवाहतूक सर्रास सुरू आहे. आरटीओच्या नाकासमोरून, तर महसूलच्या डोळ्यादेखत वाहतूक केली जात असताना अवैध रेती तस्करीवर कारवाही कोण करणार, हा प्रश्न आहे. 'अर्थपूर्ण' व्यवहारात पाणी कुठे मुरतेय, याबाबत नागरिकांमध्ये खमंग चर्चा आहे.
स्थानिक प्रशासन कारवाई करीत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली असता, नकली रॉयलटी आल्याने एका रेती तस्करांविरुद्ध शेंदूर्जनाघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महसूल पथक गेले कुठे, अशी चर्चा आहे. रेती तस्करांना आशीर्वाद कुणाचे, असा सवाल केला जात आहे.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सीमा पार करून ओव्हरलोड रेतीचे डंपर आणि मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणि जिल्ह्यात येतात. ओव्हरलोड रेती डंपर पहाटेपासून प्रवास सुरू करून सकाळी नियोजित ठिकाणी पोहचतात. याकरिता रेती तस्करांचे विशेष पथक तैनात असून पोलीस महसूल आणि आरटीओला लाजवेल, अशी पायलटिंग करून ' रोड क्लिअर'च्या सूचना देऊन वाहने पार करतात. मध्यप्रदेश सौंसर परिसरातून ३० ते ३५ तर कधी ४० टनांपर्यंत रेती भरून डंपर आणतात. रात्री ते डंपर मध्यप्रदेश हद्दीत उभे करून पहाटे ५ वाजतापासून रेती तस्करांच्या सुरक्षेत वाहतूक सुरू होते. वनविभागाच्या करवार नाकापासून सुरू होऊन पुढे आरटीओ चेक पोस्ट पार करून पुसला, वरूड, बेनोडासुद्धा पार करून ते पुढे जातात. काहींनी डंपर वगळता बंद ट्रकमधून रेतीची वाहतूक करून प्रशासनाचीही दिशाभूल केली जाते. प्रशासन मात्र मूग गिळून 'अर्थपूर्ण' सेवा देत असल्याची चर्चा आहे. यामध्ये महसूलसह पोलीससुद्धा गुंतल्याचे सांगण्यात येऊन पहिले दर्शन आरटीओचे घ्यावे लागत असल्याने परिवहन विभागसुद्धा झोपेत असल्याचे सांगण्यात येत आहे. सौंसर येथून महाराष्ट्रातील वरूड , मोर्शी, अमरावती, चांदूरबाजार, परतवाडा, अकोलापर्यंत येथून ओव्हरलोड रेतीची वाहतूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष कसे? महसुली पथकसुद्धा कुचकामी ठरल्याची चर्चा जोर धरत आहे. अधिकाऱ्याच्या वरदहस्ताखाली रेती वाहतूकदाराचे फावत आहे. या तस्करांना अभय कुणाचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेती तस्कराचे अधिकाऱ्यांसोबत सूत जमवून देणारे दलाल कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दिवसाढवळ्या अवैध रेती तस्करी आरटीओच्या नाकासमोरून, तर वरूड शहरातील मुख्य वर्दळीच्या पांढुर्णा चौकातून खुलेआम केली जात आहे. मात्र, रेतीचे ते डंपर कुणाच्याही दृष्टीस पडू नये ही शोकांतिका आहे. चौकात पोलिसांसमोरून, तर महसूलच्या डोळ्यादेखत होणारी रेतीची वाहतूक केवळ अर्थार्जनाच्या व्यवस्थेत गुंतल्याचे निदर्शनास येत आहे.