नागरिकांचा सवाल : वाहतूक पोलीस कशासाठीचांदूरबाजार : शहरात मागील काही दिवसांपासून धूम स्टाईल वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात अल्पवयीन विद्यार्थी विनापरवाना त्यांच्या दुचाकी वेगाने गजबजलेल्या बाजारपेठेतून चालवीत आहेत. शहरात वाहतूक पोलिसांची नेमणूक असतांनाही सुसाट वाहनांवर कोण अंकुश लावणार, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण त्यामुळे अरुंद झालेले रस्ते व विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे आधीच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे. त्यात या अरुंद रस्त्यावर वेगाची कास धरत मोठ्या प्रमाणात दुचाकी-चारचाकी व रेतीचे ट्रॅक्टर भरधाव धावत आहे. या रस्त्यावरुन अल्पवयीन विद्यार्थी आपल्या हायस्पीड बाईकने धूम स्टाईल वाहने चालवीत आहेत. अनेक चारचाकी वाहने सुध्दा या गजबजलेल्या बाजारपेठेत भरधाव वेगाने धावत आहेत. रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तर नियम धाब्यावर बसवून पिटाळले जातात. मात्र, यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. शहरात चार वाहतूक पोलिसांची नेमणूक आहे. मोर्शी-सोनोरी टी पॉर्इंटवर चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी टी-पॉइंटवर अनेकदा ग्रामीण वाहतूक पोलीससुध्दा दिसून येतात. मात्र, हे पोलीस फक्त आॅटोरिक्षा, काळीपिवळी वाहनांनाच अडवणुक करतांना दिसतात. मात्र या अवैध प्रवासी वाहतूकीला आळा न घालता आपले टार्गेट पूर्ण करुन त्यांना सोडण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)
भरधाव वाहनांना कोण घालणार आवर?
By admin | Updated: April 14, 2016 00:02 IST