सुविधांचा अभाव : नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा, उपाययोजनेची नगरसेवकांची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारतालुक्यातील एकमेव क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या क्रीडा संकुलात सुविधांचा आभाव असल्यामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या असुविधेविरुद्ध पालिकेच्या नगरसेवकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरासह ग्रामीण भागातही खेळाडू तयार व्हावे, त्यांना ही सर्व सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतुने शासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येते. याकरिता तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षत कारभारामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधांपासून मुकावे लागत आहे. या क्रीडा संकुलात दररोज शेकडो खेळाडू क्रिकेट, बॅटमिंटन, धावपट्टी, कबड्डी, लांब उडी, उंच उडी अशा अनेक खेळांचा सरावाकरिता क्रिडा संकुलमध्ये येतात. मात्र क्रीडा संकुलात प्रकाशाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या क्रीडा संकुलाची संकल्पना तत्कालीन राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी मांडली होती. पुढे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून या क्रीडा संकुलाला मोठा निधी उपलब्ध करून दिला. आता या संकुलाकडे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा क्रीडाप्रेमींतर्फे व्यक्त केली जात आहे. खेळाचे साहित्य आजवर या क्रीडाप्रेमींना बघायला सुद्धा मिळालेले नाही. जसे गोळाफेक, थाळीफेक, फुटबॉल, व्हॉलबॉल, भाला फेक या खेळाकरिता कोणतेच साहित्य उपलब्ध नसल्याने या खेळापासून क्रीडाप्रेमींना मुकावे लागत आहे. सध्या पोलीस भरती प्रक्रियेकरिता ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सरावाकरिता मैदानावर येतात. मात्र या मैदानावर दारूच्या बॉटली, काटेरी झुडुपे, पिण्याचा पाण्याचा अभाव, प्रशिक्षकाची उणीव, विद्युत रोषणाईसारख्या असुविधेमुळे नागरिकांची कोंडी होत असल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील क्रीडाप्रेमींना या सुविधा त्वरित पुरविण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपाल तिरमारे, बांधकाम सभापती आनंद ऊर्फ टिकू अहीर, नगरसेवक अतुल रघुवंशी यांनी तहसीलदार व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.ग्रामीण भागात खेळाडूंसाठी विशेष सुविधा उपलब्ध होणे गरजेचेयावर्षी तालुक्यातील आॅरेंजलाईन स्कूल, जगदंब स्कूल, जिजामाता स्कूलसारख्या अनेक शाळांनी फुटबॉल, कबड्डीसारख्या खेळांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली. मात्र यांना आणखी सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवरील स्पर्धेतसुद्धा बाजी मारू शकतील, अशी त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळाडूंच्या सुविधेसाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
क्रीडा संकुल ठरतेय पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:17 IST