अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही हल्ली कारागृहात बंदीस्त आहेत. मात्र, वनविभागाने याप्रकरणी तपासणीसाठी गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीचा अहवाल अद्यापही वरिष्ठांकडे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही समिती केवळ कागदोपत्री तर नाही, अशी शंका येत आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली यांच्या मृत्यूप्रकरणी तपासणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित केली होती. यात पाच आयएफएस अधिकारी, एक आरएफओ, एक एसीएफ, एक सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी, एक स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्याचा समावेश होता. त्याकरिता १६ मुद्द्यांवर या समितीला दोन महिन्यात चौकशीअंती निकषाच्या आधारे स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठांना सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. किंबहुना पोलीस विभागाने रेड्डी, शिवकुमार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात रवानगी केली आहे. ही समिती गठित होऊन महिनाभर झाला आहे. रेड्डी, शिवकुमार यांना अटक झाल्यामुळे वनविभागाने तपासणीसाठी या समितीचे कामकाज मंदावल्याचे वास्तव आहे. समितीच्या ना बैठकी, ना चर्चा सर्व काही ऑलवेल असल्यागत दिसून येत आहे. वरिष्ठांकडून समिती प्रमुखांकडे विचारणा देखील होत नसल्याची माहिती आहे. या समितीने मेळघाटात एकदाच दौरा केला असून, त्यानंतर ही समिती पुन्हा आली नाही, हे विशेष. समितीने नेमका कोणती तपासणी केली, कोणाचे बयाण नोंदविले, दीपाली प्रकरणात समितीला काही आढळून आले अथवा नाही, या सर्व बाबी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
००००००००००००००००००
अशी आहे नऊ सदस्यीय समिती
वनविभागाने दीपाली आत्महत्याप्रकरणी तपासणणीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या विभागीय वनाधिकारी पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी विजया कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्याचा समावेश आहे.