अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना अर्ज देऊनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलित ठप्प असल्याने आर्थिक सकंट ओढावले आहे. न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे विनंती केली आहे.जावरा जनुना येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांचे मौजा जावरा जनुना येथे सर्वे नं. ५२/२,५१ च्या शेतात विहीर आहे. मात्र सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या ही विहीर खचली. त्यामुळे ओलित थांबले आहे. या संदर्भात शेतकऱ्याने १० सप्टेंबर २०१३ रोजी तलाठी जावरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. मात्र तलाठी यांनी हेतुपुरस्सर अर्ज नामंजूर केल्याचा आरोप खंडार यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने ३१ जुलै २०१४ रोजी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा तहसीलदार यांच्या आदेशान्वे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्थळाला भेट देऊन निरीक्षण केले. परंतु त्यानंतरही तलाठ्याने विहीर केव्हा खचली याबाबत शेतकऱ्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारणे सुरु केले. शेतकऱ्यांना माहिती नाही, असे अहवालात नमूद करुन आमच्यावर अन्याय केला, असा आरोप रघुनाथ खंडार व चंद्रकांत खडार यांनी केला आहे. आम्हाला हेतुपुरस्सर डावलले गेले असून खचलेल्या विहीर अनुदानापासून आम्ही वंचित झाल्यामुळे आता विहीर कशी उपसावी व ओलित कसे करावे, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. याउलट जावरा येथीलच शर्मा नामक शेतकऱ्याची विहीरसुध्दा अतिवृष्टीत खचली होती. मात्र ती विहीर तलाठी यांनी मंजूर केली आहे. असा भेदभाव का, असा सवाल सदर वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी आता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये घडलेला सर्व प्रकार नमूद करण्यात आला आहे. आमच्या अर्जाचा फेरविचार करुन खचलेल्या विहिरीचे पुन्हा सर्वेक्षण करुन दोषीवर कारवाई करावी तसेच आम्हाला शासनाकडून खचलेल्या विहिरीचे दुरुस्ती अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना खचलेल्या विहिरींचे अनुदान केव्हा?
By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST