संदीप मानकर - दर्यापूरतालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारंच्या घशात जात आहे. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार होत असल्याची परिसरात चर्चा आहे. शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून अन्न सुरक्षा योजना लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्यांना २ रूपये किलो दराने २० किलो गहू व ३ रूपये किलो दराने १५ किलो तांदूळ मिळते. तसेच १३.५० पैसे किलो दराने प्रती व्यक्ती ३७५ ग्रॅम साखर देण्याची तरतूद आहे. तालुक्यात ७०८४ लाभार्थी आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (बीपीएल) या योजनेंतर्गत एका व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्याची तरतूद आहे. तर केशरी शिधापत्रिका (एपीएल) धारकांना उपलब्ध कोट्यानुसार ७ रूपये २० पैसे किलो दराने गहू व ९.६० पैसे किलो या दराने तांदूळ देण्यात येतो. दर महिन्याला प्राधान्य कुटुंबातील १८,५९० लाभार्थ्यांना २ हजार ८८६ क्विंटल गहू व १ हजार ९२४ क्विंटल तांदूळ शासनामार्फत दर महिन्याला देण्यात येतो तर अंत्योदयच्या लाभार्थ्यांना १ हजार ४१७ क्विंटल गहू व १ हजार ६३ क्विंटल तांदूळ वितरित केला जातो. परंतु हे धान्य खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का, हा खरा प्रश्न आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्याचा कोटा उपलब्ध असतानाही अनेक दुकानदार धान्य मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांना सांगून त्यांच्या तोंडचा घास खासगी व्यापाऱ्यांना विकून लाखोंची माया जमवीत असल्याचे दिसते. यामुळे काही स्वस्त धान्य दुकानदार गब्बर झाले आहेत. त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांची नियमित नोंदवही तपासली जात नाही, अशी देखील परिसरात चर्चा आहे. काही केरोसिन विक्रेतेसुध्दा केरोसिनचा काळाबाजार करून आॅटोचालकांना जादा दराने केरोसिन विकत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळेच शिंगणवाडी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाणीची घटना ताजी आहे. त्यामुळे या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
गरिबांचा गहू, तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांच्या घशात
By admin | Updated: December 6, 2014 22:39 IST