राजकीय भवितव्य : चार सदस्यीय मतदानामुळे गोंधळअमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला असून बहुतांश विद्यमान सदस्यही रिंगणात आहेत. त्यामुळे निकालाअंती कोणाचा राजकीय अस्त होणार याकडे नजरा लागल्या आहेत.पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. अनिल बोंडे, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा, आ. रमेश बुंदिले, आ. प्रभूदास भिलावेकर, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, काँग्रेसचे माजी आ. रावसाहेब शेखावत, शहराध्यक्ष संजय अकर्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाबा राठोड, बसपाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ढेपे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, महानगर प्रमुख सुनील खराटे, मनसेचे पप्पू पाटील आदी नेत्यांसाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम ठरणारी आहे. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल काँग्रेस, शिवसेना विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे बोलल्या जात आहे. महापालिकेत मावळत्या सभागृहात भाजपचे सात सदस्य होते. मात्र यावेळी भाजपची सदस्य संख्या तिप्पट होणार असल्याचे दिसनू येत आहे. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु काँग्रेसवगळता राष्ट्रवादीला फार काही यश मिळणार नाही, असे चित्र आहे. काँग्रेस किमान १२ ते १५ जागांवर विजय खेचून आणेल, असे मतदार बोलताना दिसत आहे. शिवसेनेचही संख्या वाढणार असून १५ ते १८ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. यावेळी महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धत प्रणालीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. प्रारंभी चार सदस्य निवडीसाठी सर्वच पक्षामध्ये प्रचार, पदयात्रांची चढाओढ होती. परंतु अखेरच्या टप्प्यात बहुतांश प्रभागातील उमेदवारांनी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेमुळे ‘क्रॉस’ मतदानाची दाट शक्यता बळावली आहे. त्यामुळे कोणाचा विजय होणार हे स्पष्टपणे सांगता येत नाही. किंबहुना उमेदवारही आपल्या विजयाबद्दल संभ्रमात आहेत. यावेळी महापालिका निवडणुकीत ८६ जागेसाठी ६२७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी विद्यमान ६७ नगरसेवक भाग्य आजमावित आहेत. जिल्हा परिषद ५९ तर पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी ९५० उमेदवारांचे भाग्य सील झाले आहे. त्यापैकी जिल्हा परिषद निवडणुकीत १० विद्यमान सदस्य भाग्य आजमावित आहेत.
अस्त कुणाचा ? विजय कुणाचा ?
By admin | Updated: February 23, 2017 00:10 IST