कामबंद आंदोलनाचा इशारा : रतन इंडियाच्या वकिलाचा उरफाटा सल्ला अमरावती : सदोदित पगारवाढीपेक्षा एमआयडीसीला तुमच्या जमिनी परत मागा व आम्हाला एकदा मोकळे करा, अशा उपरोधिक सल्ला ‘रतन इंडिया’च्या वकिलाने दिल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे. पगारवाढ न देता निवेदन नाकारल्याने या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रतन इंडियाच्या ‘सोफिया’ औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले ४० ते ५० कर्मचारी शुक्रवारी दुपारच्या सुमारास वरिष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग आणि हिमांंशू माथूर यांना भेटण्यासाठी गेले होते. पगारवाढीसह भविष्यनिर्वाह निधीच्या मुद्यावर या कर्मचाऱ्यांना भूमिका मांडायची होती. तथापि उभय अधिकाऱ्यांनी भेट नाकारली. कंपनीचे वकील आशिष बंग यांनी या कामगार-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन नेहमी-नेहमी पगारवाढ व अन्य मागण्या करण्यापेक्षा तुम्ही एमआयडीसीला जमिनीच परत मागा, असा खोचक सल्ला दिल्याचे प्रफुल्ल तायडे या प्रकल्पग्रस्ताने ‘लोकमत’ला सांगितले. यावेळी त्याच्या समावेत सचिव चेंडकापुरे, प्रशांत वानखडे, विनोद पांडे, अजय खंडारे, नितेश खंडारेंसह अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तुम्ही उपोषण करूनच बघा, तुम्हाला बघतोच, अशी धमकी या वकिलाने दिल्याचा आरोप प्रफुल्ल तायडेसह अन्य प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या एमआयडीसीमध्ये जमीन अधिग्रहित करण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबातील १३० जण रतन इंडियात कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)४ एप्रिलपासून कामबंदचा इशारा३१ मार्चनंतरही रतन इंडियाने स्थानिक कामगारांच्या समस्यांचे निराकरण न केल्याने शिव कामगार सेनाप्रणित कर्मचारी/कामगारांनी ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ८ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ रतन इंडियाला देण्यात आला होता.आपण कुणालाही कार्यालयाबाहेर काढले नाही. प्रफुल्ल तायडे व अन्य कामगारांशी सकारात्मक चर्चा झाली. अन्यत्र काय झाले त्याबाबत मी अनभिज्ञ आहे. - कर्नल लोकेशसिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष, रतन इंडिया.शुक्रवारी दुपारी आम्ही ४० ते ५० प्रकल्पग्रस्त हिमांशू माथूर व लोकेशसिंग यांना भेटायला गेलो. लोकेशसिंगांशी चर्चा झाली. त्यांच्या वकिलांनी उपरोधिक सल्ला दिला.प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतोय. - प्रफुल्ल तायडे, प्रकल्पग्रस्त कामगार, रतन इंडिया.
पगारवाढ कशाला हवी, जमिनीच परत मागा!
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST