अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन विद्यार्थ्यांचा शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर उठलेले लोकवादळ घोंघावत असताना आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी पुण्याच्या चव्हाण कुटुंबियांकडे जाहीर अंगुलीनिर्देश केला होता. चव्हाण कुटुंबियांचा नरबळी प्रकरणाशी संबंध काय, हा आता पोलीस तपासाचा मुद्दा आहे. कोण हे दादा चव्हाण? पुण्याचे दादासाहेब चव्हाण हे अनेक वर्षे शंकर महाराज यांचे उजवा हात मानले जायचे. विदर्भाची भाषाशैलीही अवगत नसलेल्या या चव्हाण कुटुंबियांनी आश्रमाच्याच भरवशावर अमरावती जिल्ह्यात राजकीय अस्तित्व उभारण्याचा प्रयत्न केला होता, हे 'खुले रहस्य' आहे. दादासाहेब चव्हाण यांची शंकर महाराजांशी इतकी जवळीक होती की, महाराज पिंपळखुट्याच्या आश्रमातील दरबारात बसत त्यावेळी दादासाहेबांना महाराज सर्वांदेखत खुर्ची 'आॅफर' करीत असे. आसनावर महाराज आणि जवळच खुर्चीवर दादासाहेब चव्हाण विराजमान असायचे. संचालकांसह इतर मंडळी खाली सतरंजीवर, असे चित्र आश्रमात त्याकाळी असायचे. दादासाहेबांची शंकर महाराजांशी असलेली ही जवळीक नि:स्सिम भक्तीऐवजी संधीसाधूपणासाठी उपयोगात आणली जात असल्याच्या मुद्यावरून इतर पादाधिकाऱ्यांची जाहीर नामर्जी होती. दादासाहेबांची शंकर महाराजांशी खास जवळीक असल्यामुळे आश्रमात दादासाहेब चव्हाण यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. आश्रमातील आर्थिक, धार्मिक आणि इतरही महत्त्वपूर्ण निर्णयांत चव्हाण यांचा सहभाग असायचा. बंध इतके घट्ट असताना अचानक दादासाहेब चव्हाण यांना आश्रमात येण्यास मनाईहुकूम जारी करण्यात आला. पुण्याहून पिंपळखुट्यासारख्या लहानशा गावात येऊन महिनोगिनती मुक्काम ठोकणाऱ्या दादासाहेब चव्हाण यांचा आश्रमातील वास्तव्यामागचा हेतू काय होता? आश्रमातील वास्तव्यादरम्यान त्यांनी किती पुजा केल्यात? त्या कोणत्या? त्याद्वारे कुठले इप्सित साध्य करावयाचे होते? पुजा स्वत: केल्यात की कुणाच्या आदेशाने? चौधरी यांनी केलेला इशारा नेमके काय सांगतो? नरबळी प्रकरणाच्या मुद्यात चव्हाणांचे नाव कसे घेतले गेले? पोलिसांनी या गुढ प्रश्नांची उकल करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
दादा चव्हाणांचा नरबळी प्रकरणाशी संबंध काय ?
By admin | Updated: September 24, 2016 01:20 IST