वरूड : राजुरा बाजारच्या सेवा सहकारी सोसायटीमध्ये ‘ओल्या पार्ट्या’ चालत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. नागरिकांमध्ये त्याबाबत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत अनेकांनी मौन पाळले असले तरी सहकार विभागाकडे तक्रार जाणार असल्याचे सांगण्यात येते. राजकीय विरोधकांना मात्र या घटनेत आयते कोलीत सापडल्याची खमंग चर्चा आहे.
सहकारातून उद्धार हे शासनाचे उद्दिष्ट आहे. परंतु, अशा संस्था राजकारण्यांचे अड्डे बनले आहेत. त्याची प्रचिती राजुरा बाजार येथे आल्याचे दाव्याने सांगितले जात आहे. येथील सहकारी सोसायटीच्या कार्यालयात तीन-चार जणांचे टोळके ‘ओली पार्टी’ करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच चर्चा रंगू लागली आहे . राजुरा बाजार परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. सहकार विभागाने स्वत:च दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणीदेखील समोर आली आहे.