अमरावती : शहरातील हॉटेल, लॉज व उद्योेेग प्रतिष्ठानांनी एक आठवड्याच्या आत फायर ऑडिट करवून घ्यावे. आठवड्यानंतर ते झाले की कसे, याबाबत आम्ही तपासणी करू. केलेले न आढळल्यास पुढील कारवाईची दिशा निश्चित करण्यात येईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला.
एमआयडीसी व हॉटेल इम्पेरियामधील आगीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. त्यात एमआयडीसी असोसिएशन, हॉटेल, लॉज असोसिएशन, एमआयडीसीचे अग्निशमन अधिकाऱ्यांसह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. एमआयडीसीतील आगीत मोठी वित्तहानी झाली, तर हॉटेल इम्पेरियामध्ये एका व्यक्तीचा बळी गेला. फायर ऑडिट करवून न घेणाऱ्यांसाठी, यंत्रणेसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अशा घटना घडू नये म्हणून संबंधित सर्व आस्थापनाधारकांनी अग्निरोधक यंत्रणा बसवून घ्याव्या. अग्निसुरक्षेसंदर्भात पुरेपूर काळजी घ्यावी. शासकीय नियमांनुसार उपाययोजना कराव्या. ऑडिट करवून घ्यावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिले. यावेळी आनुषंगिक निर्देश देण्यात आले.
बॉक्स
एमआयडीसीतील फायर स्टेशनही चर्चेत
बैठकीदरम्यान एमआयडीसीमधील फायर स्टेशनचा मुद्दा चर्चेत आला. त्यावर महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी तेथे योग्य प्रकारे नियोजन करून सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी फायर ऑडिट करण्यात येत असलेल्या अडचणी पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या.