राजकमल चौकात आंदोलन; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
अमरावती : स्वप्निल लोणकर या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेच्या गलथान कारभार व सरकारच्या असंवेदनशीलतेला कंटाळून आत्महत्या केली. त्याचे पडसाद अमरावतीमध्येही उमटले. ‘हमें चाहिए रोजगार’ कृती समितीने बुधवारी राजकमल चौकात राज्य शासनाविरोधात निदर्शने केली.
दीड वर्षांपासून राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या किंवा झाल्याच नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सर्व सदस्य नसल्याने मुलाखत-नियुक्ती रखडली. भविष्याची चिंता व वाढत वय यामुळे अनेक युवक आत्महत्या करीत आहेत. नॅशनल क्राईम रिपोर्टनुसार राज्यात ७२१९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अमरावती महानगरपालिकेतसुद्धा एक हजार पदे रिक्त आहेत. नोकरभरतीत ठेका पद्धतीचा वापर करून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय व अल्पसंख्यक समाजाच्या मुलांवर अन्याय होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य तातडीने नोकरभरती करावी, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निदर्शने करण्याचा इशारा बेरोजगार तरुणांनी राज्य सरकारला दिला. यावेळी किरण गुडधे, मंगेश कनेरकर, प्रदीप चौधरी, डॉ. अलीम पटेल, सतीश मेश्राम, रूपेश कुत्तरमारे, जे.एम. गोंडाणे, शीतल गाजभिये, वर्षा आकोडे, सचिन मोटघरे, रीतेश बोरकर, संघर्ष फुले, सनी गोंडाणे, ज्योती बोरकर, सुनीता रायबोले, आकाश बनसोड, रहीम राही, आदेश रामटेके, मुकेश वाघमारे, साहेबराव गाराेडे, साहेबराव नाईक, सिद्धार्थ गायकवाड, अताउल्ला खान, असलम रहबर, अंसार बेग, संगीता रायबोले, ज्योती बोरकर, वर्षा आकोडे, चेतन आठवले, यश गोसावी, एजाज खान आदीचा समावेश होता.