प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष : बांधकाम खात्याचा रस्ता जलमयचांदूर बाजार : पूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे जसापूरवासीयांना गावामधून नदी वाहत असल्याचा अनुभव येत आहे. त्या पाण्यामुळे जि.प. बांधकाम विभागाच्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे.सद्यस्थितीत पूर्णा प्रकल्पातील कालव्यामधून रबी हंगामासाठी पाणी सोडणे सुरु झाले आहे. या प्रकल्पातील हैदतपूर उपलघु कालव्यामधून सुध्दा पाणी सोडणे सुरु आहे. जसापूर जवळून जाणाऱ्या या कालव्यामधून वाहणारे अतिरिक्त पाणी नाल्यांमध्ये न काढल्यामुळे हे पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. या सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे गावातील रस्ते जलमय झाले आहेत. देऊरवाडा, शिरजगाव कसबा हा रस्ता तर पूर्णपणे पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येते. वास्तविक या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहत्या पाण्यामुळे जि.प. बांधकाम विभागाने बांधलेल्या रस्त्याची पार वाट लागली आहे. चार वर्षांपासून हिच परिस्थिती असताना पाटबंधारे विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी देखील मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमके पाणी मुरते कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तीन वर्षांपासून पूर्णा प्रकल्पाकडे या संदर्भात तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची समस्या संबंधितांनी निकाली लावलेली नाही. पूर्णा प्रकल्पाने जर पाण्यासाठी पक्की नाली बांधून गावातील नाल्यात पाणी सोडल्यास हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्यास मदत होईल. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)कालव्याच्या अतिरिक्त पाण्यामुळे जसापूरमधून गेलेला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा तीन किलोमिटर लांबीचा रस्ता खराब झाला आहे. नुकसान भरपाईसाठी प्रकल्पाला नोटीस देऊ.- अरूण रंगारी शाखा अभियंता, जि.प. बांधकाम विभाग
पूर्णा प्रकल्पाचे पाणी शिरले जसापूर गावात
By admin | Updated: October 22, 2015 00:15 IST