पूर्वतयारी : जिल्हा आरोग्य विभागाची तयारी अमरावती : पावसाळा सुरु होण्यापूर्वी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने साथरोग तसेच नैसर्गिक आपत्ती कृती नियोजन आराखडा तयार केला. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यात साथीचे आजार उदभवू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. ग्रामीण भागात पावसात साथरोग्यांची लागण होते. त्यामुळे अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. सुदैवाने मागील दोन वर्षात ग्रामीण भागात साथरोगांची लागण झालेली नाही. मात्र, यंदा पावसाळा जोमात राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आतापासूनच सावधगिरीच्या उपायांचे नियोजन सुरु केले आहे. गावात कोणत्याही आरोग्यविषयक घटना घडल्यास त्वरीत आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती देण्याचे निर्देशदेखील आशा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.अशी घ्या खबरदारी साथरोग, हत्तीरोेग नियोजन आराखड्यातील नियोजनानुसार जिल्हास्तरावर एक साथरोग पथक व नियंत्रक कक्ष तर १४ तालुक्याच्या ठिकाणी साथरोग पथक कार्यरत राहणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक याप्रमाणे ५६ पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. औषधी साठा, मनुष्यबळाची व्यवस्था केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी संगितले. नागरिकांनी पावसाळ्यात शुद्ध पाणी वापरावे, शिळे अन्न, खराब फळे खाऊ नयेत. खताचे वाडे गावापासून दूर करावेत. नकळत साथरोग पसरल्यास ग्रापं अथवा संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी.
साथरोग नियंत्रणावर ५६ विशेष पथकांचा वॉच
By admin | Updated: June 2, 2016 01:37 IST