वरूड तालुक्यात १८ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्रा आणि ३ हजार ७९० हेक्टरमध्ये मोसंबीचे पीक आहे. यावर्षी डिसेंबर, जानेवारीमध्ये पाणी शोधून संत्रा आंबिया बहराचे पीक घेतल्या जाते, तर जून, जुलैमध्ये पावसाळ्याचे पाणी आल्यावर मृग बहराचे पीक घेतात. यावर्षी ६० टक्के आंबिया बहर, तर ४० टक्केच मृग बहर आला आहे; परंतु यावर्षीच्या वातावरणीय बदलानुसार आंबिया बहर आला; परंतु विविध रोगांची साथ आल्यानं मोठ्या प्रमाणावर गळती झाली. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मृगाची वाट बघितली. मात्र, मृगाच्या पावसाने दडी मारल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, कृषी विभागाच्या काही उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाहीत. कृषी विभागाचे अंदाज शेतकऱ्यांना माहिती होत नाही, ही शोकांतिका आहे. मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेला, तर पुन्हा पडलाच नाही. यानंतरचे नक्षत्र कोरडेच गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी झाली; परंतु पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आकाशाकडे डोळे लावून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु वातावरणीय बदलाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून शासनाने कृषी कार्यालये आणि येथील अधीनस्त अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. कदाचित हवामान आणि वातावरणीय बदलाची माहिती शेतकऱ्यांना मिळाली असती तर मृग आणि आंबिया बहर हातातून गेला नसता. दोन्ही संत्रा बहर आले नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. मात्र, तालुका कृषी विभाग सुस्त असून कोणत्याही कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास असमर्थ ठरत असून, पांढरा हत्ती झाला आहे. शेतकरी चिंताग्रस्त असून, दुबार पेरणीची वेळ आली आहे.
वरूड तालुक्यात मृग बहरासह आंबिया बहरही नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST