अचलपूर : गुप्त माहितीच्या आधारावर परतवाडा वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैध सागवान आणणाऱ्या तस्करांकडूून ६५ हजारांचा माल जप्त केला. अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेल्याची घटना गुरुवारी पहाटे ४.३० वाजता घडली. परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध सागवान तस्करी केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी हरिशचंद्र पटगव्हाणकर, वन कर्मचारी सुरेश काळे, साखरे, संजय निकम, गुळसुंदरे, श्याम सावळे, कथलकर आदींच्या पथकाने सापळा रचला. परतवाडा बेलखेडा रस्त्यावर ही तस्कर सागवान चरपट, चौकटा घेऊन येत असल्याची माहिती होती. मुस्लिम कब्रस्तानजवळ पाळत ठेवून असलेल्या कर्मचाऱ्यांना तस्कर दिसताच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधारात वनाधिकाऱ्यांच्या दिशेने सागवान माल भिस्कावित त्यांनी पळ काढला. दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा बेताने पाठलाग केला मात्र सागवान तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. अज्ञात तस्कारांविरुद्ध वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन सागवान तस्करांचा शोेध घेणे सुरु असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात वनचोरीचे प्रमाण वाढले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनाधिकाऱ्यांनी पकडले ६५ हजारांचे सागवान
By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST