पत्रपरिषद : राजकुमार तिरपुडे यांची माहिती वरूड : अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत आंदोलने केलीत. परंतु येणाऱ्या प्रत्येक सरकारने या मागणीला ठेंगा दाखविला. निवडून येणाऱ्या आमदार, खासदारांनी सरकारमध्ये असताना हा मुद्दा रेटला नाही. यामुळे ेविदर्भाचा मुद्दा माघारला. परंतु विदर्भ माझा संघटनेने आता अॅक्शन प्लान तयार करून विदर्भातील ६० नगरपरिषदांमध्ये नगरसेवक पदाकरिता उमेदवार उभे करून मतदारांचा कौल घेऊन वेगळे विदर्भ राज्य निर्माण करणार असल्याचे विदर्भ माझा संघटनेचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून सांगितले. देशभरातील प्रत्येक राज्य क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भापेक्षा लहान असून विकासात्मक कामात प्रगतीवर आहे. अनेकवेळा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. परंतु त्यावर अंमलबजावणी झाली नाही, तर येणाऱ्या सरकारनेही अनेकवेळा वेगळ्या विदर्भाच्या मद्यावर राजकारणच केले. विविध संघटना पुढे येऊन आंदोलने मोर्चा काढण्यात आली. मात्र विदर्भ वेगळा झाला नाही. याकरिता नियोेजनात्मक अॅक्शन प्लान तयार करून विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या ६० नगरपरिषदांमध्ये आगामी निवडणुकीत विदर्भ माझा आपले उमेदवार उभे करून मतदारांचा कौल घेणार आहे तर येणाऱ्या प्रयत्ेक निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. असे विदर्भ माझाचे संस्थापक राजकुमार तिरपूडे यांनी पत्रकारांना सांगितले. विदर्भ वेगळा करण्याकरिता आंदोलनाची गरज नाही तर प्रत्येकाची इच्छाशक्ती जागृत होणे गरजेचे आहे. असेही योवळी सांगितले. स्वतंत्र भारत देशात राज्य निर्मितीकरिता रक्तपात करावा लागत असेल तर ती शोकांतिका आहे.म्हणून आता निवडणुकीत उमदेवार उभे करून सत्तास्थानी आणण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विदर्भ माझाचे उपाध्यक्ष इंद्रजित आमगांवकर, सरचिटणीस मंगेश तेलंग, नागपूर जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे, माजी नगरसेवक सदाराम लोणारे, प्रा.गंगाधर दवंडे, प्रकाश कासुर्दे, संजय थेटे, नरेश बारसागडे, रणधीर हरले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भाकरिता घेणार मतदारांचा कौल
By admin | Updated: August 1, 2016 00:04 IST