पुनर्वसनाचा प्रश्न रखडला : आमदारांची मध्यस्थीही ठरली व्यर्थ वरूड : तालुक्यातील भापकी या पूरग्रस्त गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा २३ वर्षांपासून रखडल्याच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आ.बोंडे यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणेदार वगळता एकही अधिकारी गावात पोहोचला नव्हता. अप्परवर्धा धरणाच्या बुडित क्षेत्रामध्ये येणाऱ्या भापकीचे हातुर्णा-लोणी स्त्यावर पुनर्वसन करण्यात आले. येथे आवश्यक सुविधांसाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. येथील नागरिकांना भूखंडांचे वाटपही करण्यात आले. भापकीची लोेकसंख्या ५०० च्या आसपास असून येथे ३५० मतदार आहेत. मात्र, मागील १० वर्षात पुनर्वसनातील बांधकाम पुन्हा मोडकळीस आले. अनेक समस्या उदभवल्या. लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल ठरली. त्यामुळे भापकीवासियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सकाळी ठाणेदार शांतीकुमार पाटीलसह निवडणूक विभागाच्या फिरत्या पथकाने नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ निर्णयावर ठाम राहिले. ग्रामस्थांनी मदतानावर बहिष्कार टाकला असताना सुद्धा कोणताही अधिकारी येथे फिरकला नाही. येथे दुसरे मतदानयंत्र लावणार असल्याचे सांगण्यात आले,मात्र दुपारी ४ वाजेपर्यत दुसरी मशिन पोहचलीच नसल्याने मतदार मतदानापासून वंचित राहिले. ठाणेदार शांतीकुमार पाटील मात्र भापकीमध्ये दिवसभर तळ ठोकून होते. ऐनवेळी भापकीचे मतदान मांगरूळी गणात भापकी हे गांव गटग्रामपंचायत असून पळसवाडा ग्रामपंचायतीमध्ये येते. लोणी पंचायत समिती गणामध्ये यागावाचा समावेश आहे. जि.प. आणि पंस करीता भापकीमध्येच मतदान केंद्र असायचे. परंतु यावेळी मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजता हे गाव मांगरूळी पंचायत समिती गणामध्ये असून बेलोरा येथील मदतान केंद्रावर ग्रामस्थांनी मतदान करावे, अशी माहिती देण्यात आली. यामुळे लोणी आणि मांगरुळीच्या उमदेवारांनी आक्षेप घेतला. उमेदवारांची तारांबळ उडाली आणि भापकीवासियांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. भापकी येथील नागरिकांनी निवडणूक विभागाकडे कोणतीही तक्रार केली नसल्याने आम्ही त्या गावाला भेट दिली नाही. बेलोरा मतदान केंद्र क्र ३७ (१३) मध्ये मतदान करण्यास कोण आले, हे सांगता येणे शक्य नाही. -डी.के.वानखडे,निवडणूक निर्णय अधिकारी
भापकीवासीयांनी नाकारले मतदान
By admin | Updated: February 23, 2017 00:15 IST