मतदारांची धावाधाव : मतदान केंद्राच्या अंतरावर आक्षेपअमरावती : गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे काम महापालिका प्रशासनाचे सोमवार पर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही. अखेर शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना राजकीय पक्षांनी वाटलेल्या स्लिपवरच अवलंबून राहणे लागण्याची वेळ आली आहे. आज मंगळवारी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. अनेक भागांमधील मतदान केंद्रांचा घोळ अजूनही कायम आहे. मतदान केंद्रे न सापडणे आणि एकाच घरातील सदस्यांना वेगवेगळी मतदान केंद्रे मिळणे हा अनुभव यंदाही आला. निवडणुकीपूर्वी मतदारांना मतदान केंद्राचा तपशील पुरविणाऱ्या मतदार स्लिप पूर्वी राजकीय पक्षांच्या यंत्रणांमार्फत घरोघरी वाटण्यात येत असत. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये प्रशासनाने हे काम आपल्या हाती घेतले. मात्र, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांना पत्ते शोधण्यात येणाऱ्या अडचणीांुळे हे काम पूर्ण होत नाही, असे यापूर्वी आढळून आले आहे. हाच अनुभव यंदाही मतदारांना येत आहे. हजारो कुटुंबांमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या स्लिप पोहोचलेल्या नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये घरोघरी आपल्या नावाने स्लिप वाटल्या, त्यांचा मतदारांना उपयोग होणार आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन स्लिप देणार असल्याने उमेदवारही त्या भरवशावर राहिले. त्यामुळे अनेक मतदार केंद्रांबाबत अनभिज्ञ राहिले. शहरातील सव्वा ते दीड लाख कुटुंबांकडे मतदार स्लिप वाटण्याचे काम ४ दिवसांपूर्वी करण्यात आले. त्यासाठी लिंक वर्करसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. मात्र प्रभागाचा पसारा पाहता व्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. (प्रतिनिधी)केंद्राचा घोळ कायममतदार यादीत नावे नोंदविणे आणि त्यांना क्रमांक देण्याचा जुनाच पायंडा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान एका केंद्रात आणि काही जणांचे दुसऱ्या केंद्रात अशी स्थिती अनुभवास मिळाली. तसेच यंदा प्रभागाचा आकार वाढल्याने मतदान केंद्र दूर असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका प्रशासनाला दर पंचवार्षिकप्रमाणे यंदाही वेळेत मतदार स्लिप वाटण्यात अपयश आले. तसेच मतदार यादीमधील घोळामुळे मतदारांच्या उत्साहावर पाणी फेरले. शहरात अनेक ठिकाणी प्रभागाच्या सीमेवर राहणऱ्या शेकडो नागरिकांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून गायब झाल्याचे दिसून आलेत.
'व्होटर स्लिप' पोहोचल्याच नाहीत
By admin | Updated: February 22, 2017 00:21 IST