अभिनव उपक्रम : व्याघ्र संवर्धनात स्थानिक युवकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्नअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४३ वर्धापन दिनानिमित्त बोरीखेडा ग्राम परिसर विकास समिती, मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठान व मेळघाटमध्ये काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प मधील गावांसाठी २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ‘कुलाकिशोर’ व्हॉलीबॉल स्पर्धाचे बोरीखेडा येथे आयोजन करण्यात आले होते. व्याघ्र संवर्धनात स्थानिक युवकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात असून या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा फक्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी गावांसाठीच घेण्यात येत असते यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक युवक सहभागी होत असतात. यावर्षी या स्पर्धेमध्ये एकूण ३४ चमूंनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे उद्घाटन २३ फेब्रुवारीला मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थानिक ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी तथा अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जंगल व जंगलातील वाघ वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे आवाहन रेड्डी यांनी करून स्पर्धेचे उद्घाटन केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचे २१,००० चे प्रथम पारितोषिक हातीदा संघाने, ११,००० चे द्वितीय पारितोषिक खोंगडा संघाने, ७००० चे तृतीय पारितोषिक धाराकोट येथील संघाने तर ४००० चे चतुर्थ पारितोषिक गडगा मालुर संघाने पटकावले. स्पर्धेच्या दरम्यान स्वयंसेवक म्हणून सेवा दिलेल्या बोरीखेडा येथील युवकांना डब्ल्यूआरसीएस पुणे या संस्थेतर्फे स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले तर विजेत्या संघांना देण्यात येणारी स्मृतीचिन्हे अमित ओगले यांचेतर्फे देण्यात आलीत. स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप प्रसंगाचे चित्रीकरणासाठी परतवाडा येथील आशीष तोमर यांचेतर्फे ड्रोन उपलब्ध करून देण्यात आला होता. स्पर्धेचे पंच व तांत्रिक सहाय्यकरिता हनुमान प्रसारक मंडळाच्या प्रशिक्षित चमूची विशेष मदत झाली.या स्पर्धेच्या आयोजनासाठी मेळघाटमध्ये काम करणाऱ्या विविध अशासकीय संस्थांनी मोलाची मदत केली. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २१,००० हे पुणे येथील स्टँडिंग फॉर टायगर संस्थेच्या रवी मोहोड यांचेकडून ११,००० चे द्वितीय पारितोषिक जयंत वडतकर, सावन देशमुख यांचे पुढाकाराने अमरावती येथील वेक्स व कार्स या संस्थेतर्फे संयुक्तपणे. ७००० चे तृतीय पारितोषिक अंगद देशमुख यांचेतर्फे ४००० चे चतुर्थ पारितोषिक यादव तरटे दिशा फाऊंडेशन यांचेतर्फे जाहीर करण्यात आले होते.स्पर्धेच्या अखेरच्या दिवसी २६ ला स्थानिकांसाठी वैद्यकीय शिबिर व रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान एकूण ४२ मुलांची विशेष तपासणी करण्यात आली. तसेच ७२ महिला व पुरुषांची तपासणी करून आवश्यक तो औषधोपचार मोफत करण्ळात आला. यासाठी लायन्स क्लब अचलपूरच्यावतीने आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये एकूण १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांचेसह व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी व विशेष म्हणजे ६ स्थानिक आदिवासी बांधवांनी सुद्धा रक्तदान केले. याकरिता बिजुधावडीचे वैद्यकीय अधिकारी मडावी, साबळे,जोग आदींचे सहकार्य लाभले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अंगद देशमुख, अमित ओगले, प्रतिक घोगरे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर व विशाल बन्सोड, दिशाचे यादव तरटे, वेक्सचे अल्केश ठाकरे, गजानन बापट, तुषा पवार, बोरीखेडा ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष गंगाराम सावलकर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे यशवंत बहाळे, अशोक आठवले, परिक्षित डंभारे तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेत. या स्पर्धेत विविध क्रिडा स्पर्धेत खेळांडूनी सहभाग घेतला आहे. तीन दिवसीय क्रिडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यात. (प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवसानिमित्त‘ व्हॉलीबॉल स्पर्धा
By admin | Updated: March 1, 2017 00:14 IST