खेड येथे हब प्रस्तावित : १०० हेक्टर क्षेत्रावर उत्पादन
मोर्शी : सीताफळ पिकाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्याच्या कृषी मंत्रालयाद्वारे दोन वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर व अमरावती जिल्ह्यातील खेड येथे नव्याने दोन सीताफळ हब स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी खेड येथे पाहणी दौरा केल्याने सीताफळ उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मोर्शी तालुक्यातील खेड येथे सीताफळ हब निर्मितीचा निर्णय घेतला. याद्वारे सीताफळ पिकाला प्रोत्साहन, विविध जातींवर संशोधन, रोपवाटिका, फळप्रक्रिया हा उद्देश समोर ठेवून वनविभागामार्फत खेड येथील वनजमिनीवर २७ हजार ५०० सीताफळ झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीतून ११.५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले. हे उत्पन्न पुढे कोट्यवधीच्या घरात जाऊ शकते. संत्रा पिकाला पर्याय म्हणून सध्या खेड परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या १०० हेक्टर शेतात सीताफळाची लागवड केली आहे. दिवसेंदिवस भूजल पातळी खाली जात असल्याने संत्राबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संत्र्याचे पर्यायी पीक म्हणून सीताफळ या पिकाकडे पाहिले जात आहे.
सीताफळापासून विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. सीताफळ गराला जगात वाढती मागणी आहे. त्यापासून शेक, आईस्क्रीम, रबडी, कँडी यांसारखी चवदार व्यंजने बनविली जातात. सीताफळाच्या पाला व बियांपासून औषधी, तर टरफलापासून बायोगॅस निर्मितीला वाव आहे. म्हणून या पिकाकडे कमी खर्चात, कमी देखभालीत , कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून पाहिले जाते. याच धर्तीवर दोन वर्षांपूर्वी खेड येथे सीताफळ प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी १४ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून, त्याला लवकरच मूर्त रूप येणार आहे.
शेतकऱ्यांची मागणी
वनजमिनीवर बिहार पद्धतीने लागवड करण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांना अनुदान व अधिक क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारणीची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हाधिकारी नवाल यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने, सरपंच कल्याणी राजस व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
कोट
राज्यातील या दोन्ही सीताफळ हबकरिता निधी मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाकडे वळतील. या पिकातून शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन रोजगार संधीदेखील निर्माण होईल. खेड येथील वनजमिनीवर किमान शंभर हेक्टर क्षेत्रावर लागवड केल्यास राज्यातील बड्या सीताफळ उत्पादनक्षेत्राचा लौकिकदेखील अमरावती जिल्ह्याला प्राप्त होऊ शकतो.
दिनेश शर्मा
सहसचिव, अमरावती जिल्हा सिताफळ महासंघ
-----------------