कृषी विभागाचे दुर्लक्ष : कृषी सेवा केंद्रात दर, साठा, तारीख कळणार कशी?गजानन मोहोड अमरावतीकृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात रोज दुकानात व गोदामात असलेला साठा, बियाणे, खताचे दर तसेच परवाना दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्तऐवज उपस्थित ठेवणेसुद्धा महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांत अवाजवी किमतीमध्ये बियाणे विक्री केल्या जात आहे व नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कृषी सेवा केंद्रात बी-बियाणे, रासायनिक खते तसेच कीटकनाशकांची विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. या परवान्यात विक्री स्थळ व गोदामांचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे. परवान्यात नमूद विक्री स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून बियाणांची विक्री करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदींचा भंग आहे. कृषी सेवा केंद्रातून विक्री केल्या जाणाऱ्या बियाण्यांचा पीकनिहाय व वाणनिहाय तहसील, उत्पादकांचे नाव, कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची तारीख इत्यादी तपशील विक्रेत्याने सही, शिक्क्यानिशी सादर करणे बंधनकारक आहे. ज्या उत्पादक कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी ठेवले आहे, त्यांना कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी दिलेली परवान्याची प्रत व प्रमाणित बियाणांसाठी लॉटनिहाय मुक्तता अहवाल तसेच उत्पादक कंपनीच्या पैदासकाराने स्वाक्षरी केलेल्या वाणाची ओळख व गुणधर्म ही कागदपत्रे विक्री केंद्रावर उपलब्ध ठेवणे ही परवाना धारकांची जबाबदारी आहे. यासह अन्य निकषांची प्रत्यक्षात होत नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या संदर्भात कृषी साहित्य विक्रेत्याला विचारणा केली जाते व बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी केली जाते. मात्र अशा रसायनांच्या शिफारशी शेतकऱ्यांना करू नये, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या उत्पादनासोबत अन्य उत्पादने घेण्याबाबतचा आग्रह विक्रेत्यांनी करू नये, यादेखील सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. दुकानात तक्रारवही बंधनकारकशेतकऱ्यांची बियाणाबाबतची तक्रार असल्यास त्याची नोंद घेऊन पाठपुरावा करण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवणे प्रत्येक विक्रेत्यास बंधनकारक आहे. अशा तक्रारीबाबत तालुका व जिल्हास्तरीय पाहणी दौऱ्याच्या वेळी परवाना धारकाने संपूर्ण माहितीसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. खरेदीदाराला द्यावयाच्या बिलावर त्याच व्यक्तीची सही बंधनकारक आहे. परवानाधारकाला कृषी सेवा केंद्रात अनुपस्थित राहावयाचे असल्यास रीतसर व्यवस्थापक नेमणे गरजेचे आहे.विक्रेत्याला निर्धारित किमतीपेक्षा अधिक किमतीने खतांची विक्री करता येणार नाही. विक्री केंद्रामधील शिल्लक खतसाठा व दरसूची सूचना फलकावर दरदिवसी निर्देशित करणे महत्त्वाचे आहे. गोदामातील विविध खतांच्या साठ्याची तारखेनुसार व बॅचप्रमाणे वर्गवारी पाहिजे. बियाण्यांचा रासायनिक खतांजवळ साठा नसावाएकाच गोदामात बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके याची साठवणूक केली जात असेल तर बियाण्यांचा रासायनिक खताशी व इतर रसायनाशी संपर्क येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बियाणे विक्रीसाठी आणून त्याची दुकानात व गोदामात साठवणूक करताना प्रत्येक कंपनीचे प्रत्येक वाण हे लॉटनिहाय वेगळे साठवणूक केलेले असावे, सोयाबीनची साठवणूक करताना एकावर एक याप्रमाणे सहापेक्षा जास्त पिशव्यांची थप्पी लागणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किरकोळ,घाऊक विक्रेतेजिल्ह्यात रासायनिक खतांची ११०४ किरकोळ व घाऊक १०० विक्रेते आहेत. बियाणांचे ११३५ किरकोळ व कीटकनाशकाचे ११०५ किरकोळ परवानाधारक विक्रेते आहेत. अमरावती येथे १६८, वरूड १४६ व दर्यापूर येथे १३१ किरकोळ रासायनिक खत विक्रेते आहेत. बियाणांचे सर्वाधिक १८४ विक्रेते अमरावतीत, १४८ वरूड, १३५ दर्यापूर व १२४ अचलपुरात आहेत. दुकानात हवे पुरेसे वाणपरवानाधारकांच्या गोदामात अधिक साठा केला जाणार नाही याची काळजी घ्यावी. साठवणूक क्षमता मर्यादित असल्यास वाणांची अथवा उत्पादक कंपन्यांची संख्या मर्यादित असावी व वाणांचा संपूर्ण तपशील फलकावर दर्शविणे महत्त्वाचे आहे.
नियमांचे उल्लंघन, प्रशासनाचे अभय
By admin | Updated: June 21, 2016 00:02 IST