कृषी विभागाचे दुर्लक्ष : बहुतांश कृषी सेवा केंद्रांमध्ये साठा, किंमत, तारखेचे फलक नाहीगजानन मोहोड अमरावतीकृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे. परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्तऐवज उपस्थित ठेवणेसुध्दा महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील बहुतेक दुकानांमध्ये या नियमांना तिलांजली देऊन अवाजवी किमतीत वाण विकले जात आहेत. ग्रामीण भागात सर्रास बेकायदा व्यवहार होत असताना कृषी विभागाचे मात्र या व्यवहारावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. दुकानांत बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे कृषीसेवा केंद्रधारकांना बंधनकारक आहे. या परवान्यात विक्रीस्थळ व गोदामांचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे. परवान्यात नमूद विक्रीस्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून बियाण्यांची विक्री करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदींचा भंग आहे. केंद्रातून विक्री केल्या जाणाऱ्या बियाण्यांचा पिकनिहाय व वाढनिहाय तपशील, उत्पादकाचे नाव, कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची तारिख इत्यादी तपशील विक्रेत्याने सही, शिक्यानिशी सादर करणे बंधनकारक आहे. विक्रेत्याला निर्धारित किमतीपेक्षा अधिक किमतीने खताची विक्री करता येणार नाही. विक्री केंद्रामधील शिल्लक खतसाठा व दरसूची सूचनाफलकावर दरदिवशी निर्देशित करणे महत्त्वाचे आहे. गोदामातील विविध खतांच्या साठ्याची तारखेनुसार,बॅचप्रमाणे वर्गवारी व्हावी. जिल्ह्यातील ठोक व किरकोळ कृषिसेवा केंद्राची रीतसर व नियमानुसार तपासणी केली जाते. यामध्ये त्रुटी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाते. शेतकऱ्यांना बिल न मिळाल्यास किंवा अन्य कुठलीही समस्या उद्भवल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. - उदय काथोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.
नियमांचे उल्लंघन, अधिकाऱ्यांचे अभय
By admin | Updated: June 8, 2015 00:35 IST