अमरावती : होम आयसोलेशनची सुविधा घेत असताना नियमांचे उल्लंघन करणे दोन रुग्णांना चांगलेच महागात पडले. तक्रारीवरून पथकांच्या सदस्यांनी भेट देऊन दोन रुग्णांना प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची गुरुवारी कारवाई केली व त्यांना नोटीसही बजावली आहे.
नियंत्रण कक्षाला प्राप्त तक्रारींवरून महापालिकेच्या पथकाने विद्यापीठ परिसर, रविनगर, अमर कॉलनी परिसराला भेट देऊन गृह विलगीकरणातील रुग्णांकडून नियमभंग होतो किंवा कसे, याची तपासणी केली. त्यात दोन रुग्णांनी नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या दोघांनाही प्रत्येकी २५ हजार दंड ठोठावल्याची नोटीस जारी करण्यात आली. महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांच्यासह पालिका कर्मचारी व पोलीस शिपाई यांचा पथकात समावेश होता.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती मिळण्यासाठी व गृह विलगीकरणाबाबतीत निर्णयांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. गृह विलगीकरणातील रुग्ण अनेकदा घराबाहेर पडून नियमभंग करतात. त्यामुळे त्यांच्या घरावर फलक लावावेत, तसेच ते घराबाहेर पडून नियमभंग करत असतील, नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना करावे व तक्रारीनुसार कारवाईचे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
बॉक्स
असा करावा अर्ज
महापालिकेकडून नियंत्रण कक्षासह संकेतस्थळही सुरू करण्यात आलेले आहे. गृह विलगीकरणासाठी अर्ज करताना रुग्णांनी या कक्षाला रुग्णाच्या घरातील व्यवस्था, स्वतंत्र राहण्याची सोय, त्यांना असलेली लक्षणे ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी व तसेच विलगीकरणाचा फॉर्म ‘होम आयसोलेशन एएमटी.कॉम’ या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.