जिल्हाधिकारी : मालखेड उपकेंद्राला भेट
चांदूर रेल्वे : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणास आरंभ झाला असून, उपकेंद्रांवरही लसीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील आरोग्य उपकेंद्रावरील लसीकरण केंद्राची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र कोवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत हुतके आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांनंतर उपकेंद्रांवरही लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. त्यानंतर गावोगाव शिबिरे घेण्याचेही नियोजन आहे. कोविडकाळात आरोग्य यंत्रणा जिवाची पर्वा न करता खंबीरपणे कार्यरत आहे. अजूनही कोविडविरुद्धची लढाई संपलेली नाही. रुग्णसेवेहून मोठे कार्य नाही. त्यामुळे यापुढेही अशाच खंबीरपणे लढण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. यावेळी त्यांनी केंद्रावर उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधला. आज ४५ वर्षांवरील २ हजार २०० व ६० वर्षांवरील १ हजार ८०० व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. जयंत करंजीकर यांनी दिली.