पान २ ची बॉटम स्टोरी
दुर्लक्षित : नगरपंचायत करणार का कारवाई?
धारणी : भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून देशातील जवळपास प्रत्येक तालुक्यात जयस्तंभ स्मारकाची निर्मिती करण्यात आली. धारणी येथे टपाल कार्यालयासमोर जयस्तंभ उभारण्यात आला. त्याला आता जवळपास ७३ वर्षे लोटली आहेत. काळानुरूप जयस्तंभचे ‘जयस्तंभ चौक’ असे नामकरण झाले. मात्र, अलीकडे हा जयस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.
स्थापनेच्या काळात नागरिकांचे प्रेरणास्रोत म्हणून जयस्तंभची गणना व्हायची. कालांतराने जनमानसामध्ये स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या या विजयस्तंभाची हेटाळणी सुरू झाली. या स्तंभाच्या जवळपास लोकांनी अतिक्रमण केले. परिणामी, हा स्तंभ झाकोळला गेला आहे. नगरपंचायतच्या नवनियुक्त प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याकडून धारणीवासीयांना अपेक्षा आहेत. त्यांनी येथील अतिक्रमण दूर सारून जयस्तंभाचे सौंदर्यीकरण, डागडुजी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्मारकासमोर लागतात हातगाड्या
धारणी शहर आता चहुबाजुने विस्तारले आहे. बाजारपेठेत जागा घेऊन दुकान उभारणे सर्वसामान्यांना शक्य नाही. त्यामुळे चौकाचौकांत अतिक्रमण झाले आहे. जयस्तंभ त्याला अपवाद ठरलेला नाही. या जयस्तंभासमोर आमलेट, पाव व अन्य खाद्यपदार्थ बनविण्याच्या हातगाड्या लावल्या जातात. तेथील कचरा जयस्तंभासमोर टाकला जातो. तेथील चबुतऱ्याचीदेखील दुरवस्था झाली आहे.
------------------