सोफियाविरुद्ध संताप : वचन दिले, रोजगार मात्र नाहीअमरावती : जिल्हाधिकारी किरण गित्ते गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामकाज आटोपून प्रशासकीय कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणार असल्याने त्यांच्या दिमतीला असलेले शासकीय वाहन एम. एच. २७-एए ११११ जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेल्या वाहनाला अचानकच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यायाच्या परिसरात घेरल्याने तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तांराबळ उडाली होती. मात्र प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्र्वासन दिल्याने तणाव निवळल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये इंडिया बुल्सच्या सोफिया या ऊर्जा प्रकल्पात स्थानिक तरूणांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात यावा यासाठी ११ ते १४ आॅगस्टपर्यंत स्थानिक लोकाधिकार जागृती अभियान समितीतर्फे माहुली जहागीर, सावर्डी, पिंपळविहीर, डिगरगव्हाण, डवरगाव, वाघोली, यावली शहीद, नांदुरा, सालोरा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे सुरु असलेल्या इंडिया बुल्स कंपनित स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न करता इतर राज्यातील युवकांना नोकरीत सामाहून घेत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांवर व स्थानिक युवकांवर अन्याय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पात वरील लोकांना नोकरी द्यावी तसेच या प्रकल्पासाठी कोळसेची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जात असल्याने वरील गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे नियमबाह्यरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवकर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. मात्र या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती नव्हती अशातच प्रकल्पग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. यातील ५ लोकांना प्रथम पोलिसांच्या माध्यमातून चर्चेचे निमंत्रण दिले. सर्वांना कार्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणी रेटून धरली. पुन्हा त्यांना समजविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांनी प्रयत्न केला. मात्र ते समजण्याच्या स्थिती नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला. जोपर्यंत जिल्हाधिकारी चर्चा करणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले. अखेर वातावरण तापत असल्याचे पाहून प्रशासनाने सभागृहात सर्वांना बोलावून चर्चा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. यावेळी आंदोलकर्त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी समजावून घेतल्या. त्यामुळे हे आंदोलन निवळले. आंदोलनात प्रवीण मनोहर, अमोल पाचघरे, सचिन चेंडकापुरे, पुरुषोत्तम भोजने, कैलाश धनसुईकर, पांडुरंग धनसुनकर, राजेश जेवडे, अविनाश खंडारे, इंदल भोसले, भारतसिंग दासपवार, नितेश खाडे, नितेश खंडारे, प्रफुल्ल तायडे, प्रवीण भोसले, शेख इकरात अ.जब्बार, मो.शकील मो.नजीर, मो.युसूफ मो.सरोवर, विनोद खंडारे यांच्यासह अन्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन
By admin | Updated: August 14, 2014 23:30 IST