गैरप्रकार वाढण्याची शक्यता : भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना साध्या कागदाच्या चिठ्या देण्यात येत असल्यामुळे पुन्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे चिठ्ठ्याच्या माध्यमातून गैरफायदा घेण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.जिल्ह्याभरातील आरोग्य सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचा सहभाग आहे. मात्र दिवसेंदिवस हे रुग्णालय हलगर्जीपणाचा कळस गाठत आहे. दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येत असतानाही या रुग्णालयात सुविधांच्या अभावाचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड नेहमीच असते. सद्यस्थितीत उपचारकरिता येणाऱ्या रुग्णांना साध्या कागदावर ५ रुपये घेऊन नोंदणी केल्याची चिठ्ठी रुग्णालयाच्यावतीने देण्यात येत आहे. काही चिठ्ठ्यावर रुग्णालयाचा शिक्का मारुन वापर करण्यात येत आहे. त्याच चिठ्ठीच्या आधारावर तेथील डॉक्टर औषधोपचार करीत आहेत. हा प्रकार रुग्णांच्या औषधोपचारात अडसर निर्माण करणारा ठरु शकतो. रुग्णालयातील ही चिठ्ठी रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाची समली जाते. त्यातच गुन्हेगारी क्षेत्रातील आरोपीचे खटले न्यायालयापर्यंत गेल्यावर पुरावा म्हणून ही चिठ्ठी उपयोगी ठरते. मात्र ही चिठ्ठी साध्या कागदावर देण्यात येत असल्यामुळे न्यायालयात ग्राह्य धरले जाईल का, ही शंका निर्माण होत आहे.
इर्वीनच्या ओपीडीत साध्या चिठ्ठ्यांचा वापर
By admin | Updated: September 2, 2014 23:23 IST