कारवाई करा : आ.अनिल बोेंडेंची मागणी अमरावती : जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील आदिवासीबहुल भागात तसेच इतर ग्रामीण क्षेत्रामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व ग्रामगीताचार्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या ग्रामगीतेमधील दाखले देऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून प्रार्थना पुस्तिकेवर बंदी आणण्याची मागणी आ.अनिल बोंडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केली. आ.बोंडे यांनी केलेल्या आरोपानुसार, नितीन सरदार व ख्रिस्तभक्तमंडळी, गुरूदेव सेवा मंडळ, सत्यशोधक समाज यांनी प्रकाशित केलेल्या ‘प्रार्थना’नामक पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर राष्ट्रसंत व ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे छायाचित्र आहे. वरणकरणी राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेची पुस्तिका भासावी अशी, ही पुस्तिका आहे. सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व सांगताना राष्ट्रसंतांनी दिलेले प्रभू येशू ख्रिस्ताचे उदाहरणसुद्धा यात नमूद आहे. यामुळे सर्वसामान्य जनांमध्ये असलेली राष्ट्रसंतांबद्दलची आदरांजली, भक्ती, आदरभावाचा वापर ख्रिस्ती धर्मप्रचाराकरिता केल्याचे आ.बोंडे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नितीन सरदार व ख्रिस्तमंडळी, १३ अ गांधी ले-आऊट, न्यू पांडे लॉनजवळ, नागपूर यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी बोंडेंनी केली आहे. (प्रतिनिधी)
ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर
By admin | Updated: March 28, 2017 00:10 IST