सध्या ३३६ मीटर साठा : पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षामोर्शी : चार दिवसांपासून मोर्शी तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात २५४.८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा आजच्या तारखेस हा पाउस अधिक बरसला असला तरी अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर मागील वर्षापेक्षा सध्या २.३९ मिटर ने कमी आहे. यावर्षी ५ जुलैपर्यंत तालुक्यात २५४.८४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेपर्यंत २१४.८७ मिमी पाउस बरसला होता. एकूणच आजच्या स्थितीत ३९.९७ मिमी पाऊस जास्त बरसला असला तरी अप्पर वर्धा धरणातील जलस्तराची स्थिती मागील वर्षापेक्षा कमी आहे. मागील वर्षी अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर ३३८.९९ मीटर होता. यावर्षी मात्र जलस्तर ३३६.६० मीटर म्हणजेच मागील वर्षापेक्षा २.३० मीटरने कमी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसल्यास जलस्तर वाढीस मदत होईल. अप्पर वर्धा धरणातील सध्या एकूण जलसाठा २७३.२६ दशलक्ष घनमिटर एवढा असून उपयुक्त जलसाठा १५९.०४ दशलक्ष घनमिटर आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी २८.२० एवढी आहे. दरवर्षी पावसाळ्यात धरणातील जलसंग्रहणाचे नियोजन करण्यात येते. यावर्षी जुलै महिन्यात ३४१.२० मीटर एवढा महत्तम जलसाठा ठेवण्यात येणार आहे. सध्या धरणातील जल पातळी ३३६.६० मीटर असून नियोजित पातळी गाठण्याकरिता अजूनही ४.६० मीटर जलस्तर वाढणे आवश्यक आहे. जुलै संपण्याकरीता अजून तीन आठवड्यांचा अवधी आहे. या कालावधीत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसल्यास नियोजित जलस्तर गाठणे अशक्य नसल्याचे अभियंता सहायक साने यांनी 'लोकमत'ला सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
उर्ध्व वर्धात गतवर्षीपेक्षा अडीच मीटरने साठा कमी
By admin | Updated: July 7, 2016 00:05 IST