फोटो पी २३ अंजनगाव बारी
अंजनगाव बारी : चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख रबी पिके जमिनीशी समांतर झाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच पालेभाज्या अवकाळी पावसामुळे सडल्या. वादळामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू आदी झाडे कोसळून पडली आहेत.
अंजनगाव बारी परिसरात गारपीट झाल्याने कांदा, गहू हे पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यावर्षी ६० टक्के गहू शेतकऱ्यांच्या घरी आला. मात्र, ४० टक्के पीक अद्यापही शेतात पडून आहे. पावसाचे पाणी शिरून गव्हाच्या पेंड्या सडत आहेत. पपई, आंब्याची झाडे वादळाने झाडासह कोसळून पडली आहेत. शेतकरी उत्पन्न वाढविण्यासाठी फळपिकांकडे वळले असताना, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, लिंबू, डाळिंब ही फळपिके मातीमोल झाल्याने यंदा मुद्दल निघेल, याचीही शाश्वती नाही. परिसरात १० ते १५ गावांतील पार्डी (देवी), अडगाव (बु.), मांजरी म्हसला, उतखेड, टिमटाळा, मालखेड (रेल्वे), आमला (विश्वेश्वर), मांजरखेड (कसबा), बासलापूर येथेही वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
३०० वीटभट्ट्यांचे नुकसान
अंजनगाव बारी परिसरात ३०० वीट कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदाराचा एक ते दीड लाख एवढा माल निरुपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मजुरांची घरावरील टिनाची छपरे उडाल्याने संपूर्ण मजूर गावी निघून गेली. परिणामी वीटभट्ट्यांचा परिसर ओस पडला आहे.
बॉक्स
पोर्टलवर नोंदवा माहिती
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव व शेत सर्वे नंबर गावातील तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याकडे द्यावे, असे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ही माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.