अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसंबंधी प्रतिबंध ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत नियोजन चालविले आहे. विविध प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर १५ फेब्रुवारी २०२१ पासून हिवाळी परीक्षा सुरू होतील, अशी माहिती आहे.
विद्यापीठाने नवीन शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार १५ फेब्रवारी ते २० मार्च २०२० या दरम्यान हिवाळी परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याची तयारी आहे. मात्र, कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने शासन गाईड लाईननुसार नियमात कठोरपणा आणून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती आहे. हिवाळी २०२० ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्धारे घेण्यात येणार आहे. परीक्षा, निकाल, मूल्यांकनाचे स्वरूप, ऑनलाईन परीक्षा फाॅर्म आदी बाबी निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळ, विद्वत् परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊनच केली जाणार आहे. ही परीक्षा प्रथम वर्ष वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे.
-----------------------
महाविद्यालयस्तरावरच होईल परीक्षा
हिवाळी २०२० परीक्षा ही महाविद्यालयस्तरावरच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बहुुपर्यायी प्रश्नावलीच्या आधारे होणाऱ्या परीक्षेची नियमावली कठोर करण्यात येणार आहे. पावणेचार लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील. विद्यार्थ्यांना परीक्षा फाॅर्म गुगलवर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षा होताच ३० दिवसात निकाल जाहीर होतील, अशी तयारी प्रशासनाने चालविली आहे.
---------------------
प्रचलित पद्धतीने हिवाळी परीक्षांच्या नियोजनाची तयारी आहे. मात्र, कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ येणार असल्याने परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, विविध प्राधिकरणात चर्चा करूनच त्यांच्या मान्यतेनुसार बहुपर्यायी प्रश्नावलीद्धारे ऑनलाईन परीक्षा होतील.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.