राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील घटना वानरीच्या अनाथ पिल्लाला मिळाली मायेची कूस!
वैभव बाबरेकर अमरावती
मानवी संवेदना दिवसेंदिवस हरवत चालल्या आहेत. धावपळीच्या युगात एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची औपचारिकता पार पाडणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अपघातात मरण पावलेल्या वानरीच्या अनाथ पिल्लाला आपल्या कळपात सामावून घेऊन वानरांनी अनोख्या सहृृदयतेचा परिचय दिला.
एवढेच नव्हे तर या कळपातील एका वानरीने स्वत:च्या चिमुकल्यासोबतच या अनाथ पिल्लालाही स्वत:च्या कुशीत घेतले. हे दृश्य बघताना वनविभागाच्या कर्मचार्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले. विस्तृत माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी सायंकाळी एका वानरीचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे तिचे पिल्लू अनाथ झाले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्या पिल्लाला जंगलातील माकडांच्या दुसर्या कळपात सोडण्यात आले. वास्तविक माकडे दुसर्या कळपातील नवीन सदस्याला आपल्या कळपात स्थान देत नाहीत. माकडांची ही प्रवृत्ती सर्वश्रुत आहे; परंतु वनविभागाच्या कर्मचार्यांना याबाबत वेगळाच अनुभव आला.
अपघातात आई गमावल्यानंतर शोकमग्न अवस्थेत सैरभैर झालेले पिल्लू आईची कुस शोधत होते. काही नागरिकांनी त्या पिल्लाला राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. वानरीच्या पिल्लाला आश्रय मिळावा, असा आमचा उद्देश होता. परंतु प्राण्यांच्या स्वभावधर्मानुसार ते अन्य कळपातील सदस्याला स्वीकारत नाहीत. त्यामुळे ही बाब शक्य होईल, असे वाटत नव्हते. परंतु त्या कळपातील माकडांनी दिलदारपणे अनाथ पिल्लाला स्वीकारले. एवढेच नव्हे तर त्याचे अनोखे स्वागतही केले, याचेच समाधान आहे. -पी.के लाकडे वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी