गोरखधंदा : गाडगेनगर ठाण्यात तक्रारअमरावती : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असो वा चौक, गल्लीबोळ असो की, रस्त्यावरील दुभाजक अवघे शहर अनधिकृत फ्लॅक्स आणि बॅनरने व्यापले आहे. आता असे बॅनर्स व होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरूध्द फौजदारीचा दंडुका चालविला जाणार आहे. गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी मार्गावर लावलेल्या फलकधारकांवर गाडगेनगर ठाण्यात अधिकृत तक्रार करण्यात आली आहे. बाजार परवाना विभागाचे सहायक अधीक्षक रामदास वाकपांजर यांच्या तक्रारीवरुन गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गेन कोचिंग क्लासेस (राधानगर), गाला एंटरप्राईजेस (रा. राम-लक्ष्मण संकूल) सीसीआयटी अॅकेडमी (गाडगेनगर) आणि केबीसीटी क्लासेस (शासकीय तंत्रनिकेतन समोर) यांचे विरूध्द महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कलम ३,४, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तूर्तास शहराच्या कानाकोपऱ्यात विशेषत: कॅम्प, पंचवटी ते गाडगेनगर ते पुढे नवसारीपर्यंत कोचिंग क्लासेसच्या फलकबाजीने कळस गाठला आहे. आपल्याच कोचिंग क्लासचा रिझल्ट कसा चांगला, हे ग्राहक पालकांपर्यंत पोहोचविण्याचे कसब या फ्लॅक्स व बॅनरमधून साधले गेले आहे. महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता तसेच रितसर शुल्क न भरता हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरु आहे. उच्च न्यायालयाने फ्लेक्सच्या बेसुमार वापराबाबत यापूर्वीही राज्यातील महापालिकांचे कान टोचले आहेत. त्यानंतरही शहरीभागासह ग्रामीण भागातही उच्च न्यायालयाच्या आदेशांची अवमानना होत आहे. हे रोखण्याची जबाबदारी महापालिका यंत्रणेची असल्याने कार्रवाईचा धडका लावून फ्लँक्स, बॅनरबाजांवर किमानपक्षी अंकुश लावावा आणि दखलपात्र गुन्हेच दाखल करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
अनधिकृत फलकबाजांवर फौजदारीचा चाप !
By admin | Updated: May 7, 2016 00:39 IST