मोहीम प्रारंभ : १५ कोटींचा प्रस्ताव पाठविणारअमरावती : येथील ब्रिटिशकालीन छत्री तलावाचे सौंदर्यीकरण, मुंबईच्या धर्तीवर चौपाटी, नाना-नानी पार्क अशा भव्यदिव्य सोईसुविधा अमरावतीकरांना मिळाव्यात, यासाठी १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करुन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी छत्री तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विविध समस्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत आ. रवी राणा यांनी ब्रिटिशकालीन छत्री तलावाची दुर्दशा मुख्यमंत्र्यांसमोर विशद केली. या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी १५ कोटी रुपयांची मान्यता देताना मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा तयार करण्याचा सूचना केल्यात. परिणामी पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी या तलावातील जेसीबीने गाळ काढण्याला आ. रवी राणा यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, लप्पी जाजोदिया, प्रयास संस्थेचे अध्यक्ष अविनाश सावजी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. राणा यांनी या तलावातील गाळ काही वर्षांपासून काढण्यात आला नसल्याने तो साचून राहिला. त्यामुळे तलावातील झरे बुजून ते बंद झाले आहेत. मात्र आता गाळ काढण्यामुळे तलावाची खोली वाढून जलपातळी वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. स्थानिक दस्तुरनगर ते भानखेडापर्यंत रस्ता रुंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याकरिता ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे उभारले जाणार असून दोन कोटी रुपये खर्च केला जाईल, असे राणा यांनी सांगितले. छत्री तलावाला पर्यटनक्षेत्र विकसित करताना या तलावावरील मक्तेदारी संपुष्टात येऊन हे तलाव जनतेलाच ताब्यात दिले जातील, असेही ते म्हणाले.मोहिमेप्रसंगी नगरसेवक सुनील काळे, राजेंद्र महल्ले, प्रशांत वानखडे, सपना ठाकूर, जयश्री मोरय्या, आशा निंदाने, सुनील राणा, अशोक जैन, जीतू दुधाने, संजय हिंगासपुरे, अनूप अग्रवाल, आशीष गावंडे, शैलेंद्र कस्तुरे, अजय मोरय्या आदी उपस्थित होते.गाळ वाटप होईल मोफतछत्री तलावातून निघणारा गाळ हा शेतकरी, कुंभार, विटभट्टी, पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष संवर्धन प्रेमींना मोफत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. आ. राणा यांनी हा गाळ मोफत देण्यासंदर्भात सूचना देताच आयुक्त गुडेवार यांनी तसा निर्णय घेतला. ज्यांना गाळ घ्यायचा असेल त्यांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.तलाव परिसरात 'या' बाबींना मिळणार स्थानछत्री तलाव परिसराचा विकास आराखडा तयार करुन राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यानुसार काही महत्त्वपूर्ण बाबींना स्थान दिले जाणार आहे. यात नाना- नानी स्पॉट, आकर्षक उद्यान, लहान मुलांसाठी खेळणी, पायदळ चालण्याचा मार्ग, संगीतमय कारंजे, खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल उभारले जाईल.
छत्री तलावाचे रुप पालटणार
By admin | Updated: May 23, 2015 00:29 IST