महावितरणकडून ११०० केव्ही उच्चदाब वाहिनी आस्था आरंभसिटी या ले-आऊटमधून टाकण्यात आली. या ले-आऊट मालकाने ती लाईन एक ते दीड महिन्यांपासून ले-आऊटमधून काढून वस्ती असलेल्या दुर्गवाडा येथील नागरिकांच्या घराच्या अंगणातून नेली. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ७ च्या सुमारास नैनीष शाहू कोरे (४) व आकांक्षा सिद्धार्थ मोरे (५) ही मुले अंगणात खेळत असताना, अंगणात शॉर्ट सर्कीट होऊन वीज प्रवाह संचारला आणि ही दोन्ही मुले त्या तारेला चिकटल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काठ्यांनी त्यांना हलवून बाजूला केले. लाईनमनला फोन करून वीजपुरवठा बंद करण्यात आला व बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या मुलांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही मुलांना जीवनदान दिले. या प्रकरणाची तक्रार मुलांच्या नातेवाइकांनी मोर्शी पोलिसांत केली आहे.
-----------------