वरूड : अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्यावतीने रात्रीची गस्त सुरू केली. दरम्यान धनोडी गावात दोन अवैध रेतीचे ट्रक उभे असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून रेतीसह दोन ट्रक (डंपर) जप्त करून ट्रक चालकांसह मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. या कारवाहीत ट्रकसह २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध रेती वाहतूक वरूड तालुक्यात होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन.यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा आणि शेंदूरजनाघाट पोलिसांची गस्त सुरू असताना धनोडी गावात अवैध रेतीचे दोन ट्रक उभे असल्याचे २९ जूनला समजले. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रक क्र. एमएच २७ बीएक्स ३१२३, एमएच ४० बीजी ६६६० मध्ये अवैध ओव्हरलोड रेती आढळून आली. यावेळी ट्रक मालकाला वैध रेती परवाना मागितला असता दाखविला नाही. यामुळे दोन्ही ट्रक जप्त करून शेंदूरजनाघाट ठाण्यात नेण्यात आले. ट्रकमध्ये ८ ब्रास रेती दोन्ही ट्रक (डंपर) २० लाख रुपये असा २० लाख ४० हजार रुपयेच मुद्देमाल जप्त करण्यात आला. रेती वाहतूक ही बनावट परवाण्यावर सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. यावरून दोन ट्रक चालकसह ट्रकमालक विलास पुरी (रा. अमरावती) विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तपासात बनावट रायल्टी कशाप्रकारे तयार केली जाते, याचा शोध पोलीस घेत आहे. बनावट रॉयल्टीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपस ठाणेदार श्रीराम गेडामसह शेंदुरजनाघाट पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.